World Animal Day 2021 : पाळीव प्राणी तसेच इतरही प्राण्यांवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आजचा दिवस अशा लोकांसाठी खास आणि महत्वाचा आहे. जगभरात दरवर्षी 4 ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातोय. 


जागतिक प्राणी दिनाचा इतिहास
असिसिचे संत फ्रान्सिस यांचं प्राण्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी 4 ऑक्टोबर 1925 या दिवशी प्राण्यासाठी 'उत्सव दिन' म्हणजे Feast Day साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर 1931 साली इटली येथे इंटरनॅशनल अॅनिमल प्रोटेक्शन काँग्रेस भरवण्यात आली होती. त्यामध्ये संत फ्रान्सिस यांचा सन्मान म्हणून 4 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय प्राणी दिवस साजरा करण्याचं ठरवलं. 


जागतिक प्राणी दिनाचा उद्देश आणि महत्व
जागतिक प्राणी दिनाचा मूळ उद्देश हा जगभरातील प्राण्यांच्या परिस्थितीवर आवाज उठवणे आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणे, त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. आजच्या दिवशी जगभरातील प्राणीमित्र संघटना, प्राणी हक्क संघटना तसेच या विषयावर कार्य करणाऱ्या विविध संघटना एकत्रित येतात आणि जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 


जगभरातले सर्व प्राणी, म्हणजे पाळीव प्राणी आणि जंगलातले प्राणी, या सर्वांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचाही आज सन्मान केला जातो. पशु-पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाचे जे काही कायदे आहेत, त्यांना अद्ययावत बनवण्यासाठी विविध प्राणी संघटना प्रयत्न करतात. त्यामुळे शिकारी अथवा तस्कर हे कायद्यातील पळवाट शोधून पळून जाणार नाहीत. 


प्राणी हे निसर्गातील अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहेत. आजही जगभरातल्या जवळपास एक अब्ज गरीब लोकांना प्राण्यांमुळे रोजगार मिळतोय. त्यामुळे शाश्वत विकासासाठी प्राण्याची काळजी घेणे, त्यांचं संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.  


संबंधित बातम्या :