लखनऊ : लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने, आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. प्रशासनाने आता या परिसरात 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येतोय. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे.


काल रात्रीपासून या ठिकाणी शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. 


आज पहाटे साडे चार वाजता लखीमपूर या ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकेत पोहोचले असून त्यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांचं अंतिम संस्कार केलं जाणार नाही असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे. 


या घटनेवर पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या एफआयआरमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचे, आशिष मिश्रा यांचं नाव नोंदवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. 


प्रियांका गांधीना रोखलं
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लखीमपूरमध्ये जाण्यापासून प्रशासनाने रोखलं आहे. त्यांना सीतापूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. या दरम्यान प्रियांका गांधी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तसेच उत्तर प्रदेशमधील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते अखिलेश यादव आणि सतिश चंद्र मिश्रा यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. 


लखीमपुरात काय झालं होतं?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या :