Kangana's Padma Shri Award: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं अशा आशायाची तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामुळं देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच तिचा पद्म पुरस्कार काढून घेण्याची मागणींनी जोर धरलाय. याच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांना पत्र लिहून कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार मागे घ्यावा. कंगनानं शहिदांचा अपमान केलाय. तिच्याविरोधात देशद्रोहाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात यावा, अशीही मागणी स्वाती मालीवाल यांनी केलीय. 


स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राची प्रत ट्विटरवर शेअर केलीय. ज्यात त्यांनी असं लिहलंय की, अभिनेत्री महात्मा गांधी, भगतसिंह यांच्या हौतात्म्याचा विनोद वाटतो. त्यांच्या बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य आणि कोट्यवधी लोकांची तपश्चर्यां भीक वाटते. तिला पुरस्कार नव्हेतर, उपचाराची गरज आहे. तिचा पद्मश्री पुरस्कार ताबडतोब मागे घ्यावा आणि तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असं पत्र स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात नमूद केलंय. 


नेमका वाद काय?


अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले की, 'भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं. भारताला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यावर मिळालंय. कंगना राणौतच्या या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ झाला आहे. संपूर्ण देशभरातून तिच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय. याचदरम्यान, तिच्या घरासमोर अनेक लोकांनी निदर्शनही केली. यानंतरही कंगना थांबली नाही. तिनं इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एक पोस्ट केली. ज्यात तिनं असं म्हटलंय की, "1857 हा स्वातंत्र्यासाठीचा पहिला सामूहिक लढा होता आणि सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तींनी बलिदान दिले. मला 1857  माहिती आहे, पण 1947 मध्ये कोणते युद्ध झाले? मला माहिती नाही. हे जर कोणी मला सांगू शकले तर मी माझे पद्मश्री परत करेन आणि माफीही मागेन", असं तिनं म्हटलं होतं. 


कंगनाच्या याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहलंय. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केलीय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-