Major Dhyan Chand: सुमारे तीन दशकांपूर्वी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने सुरु करण्यात आलेला सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार' यापुढे 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले जाणारे आणि हॉकीत भारतासाठी तीन ऑलिम्पिक पदकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले, मेजर ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात यकृताच्या कर्करोगाशी लढताना निधन झाले. मात्र, अनेकांना मेजर ध्यानचंद यांच्या मृत्यूसमयीची गोष्ट माहित नाहीय. ध्यानचंद यांनी आपले प्राण अभिनेते गजेंद्र चौहान यांच्यासोबत असताना रुग्णालयात सोडले. याबद्दल स्वतः गजेंद्र चौहान यांनी एबीपी न्यूजशी खास बातचीत केली.
अभिनेते गजेंद्र चौहान एम्स रुग्णालयात होते..
बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये युधिष्ठिराची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेले अभिनेते गजेंद्र चौहान, एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले, की 'त्या दिवसात मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये रेडिओग्राफर (पॅरा मेडिकल स्टाफ) म्हणून काम करत होतो. मी 11 सप्टेंबर 1979 पासून रेडिओग्राफर म्हणून एम्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांनी मेजर ध्यानचंद यांचे त्याच रुग्णालयात निधन झाले.
मेजर ध्यानचंद यांनी माझ्या हातात जीव सोडला : चौहान
गजेंद्र चौहान यांनी सांगितलं की, 'लिव्हर कॅन्सरच्या उपचारासाठी दाखल झालेले ध्यानचंद त्या दिवसांत अर्धबेशुद्ध अवस्थेत होते. अशा परिस्थितीत मला डॉक्टरांकडून रात्री उशिरा मेजर ध्यानचंद यांचा एक्स-रे काढण्याची सूचना मिळाली, जी मी पार पाडली. मेजर ध्यानचंद यांचा मुलगा अशोक कुमार त्यावेळी वडिलांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात हजर असायचा. ध्यानचंदच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी, ध्यानचंदचा मुलगा अशोक कुमार याने मला सांगितले की मी चहा पिऊन परत येईपर्यंत वडिलांसोबत रहा. पण थोड्या वेळाने, जेव्हा अशोक कुमार खालून खोलीत परतला, तेव्हा मेजर ध्यानचंद यांनी हातात जीव सोडला होता.
ध्यानचंद यांचा मुलगा येईपर्यंत त्यांनी हे जग सोडलं होतं : चौहान
या घटनेवर अधिक सविस्तर सांगताना गजेंद्र चौहान म्हणाले, "अंथरुणाला खिळलेले मेजर ध्यानचंद यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अशा परिस्थितीत मी लगेच त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचं डोकं माझ्या दोन्ही हातात घेतल्याबरोबर काही क्षणात त्यांनी कायमचे डोळे मिटले. जेव्हा अशोक कुमार परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या वडिलांचे डोके माझ्या हातात आहे. हे दृश्य पाहून त्याला समजले की आता त्याचे वडील ध्यानचंद या जगात नाहीत.
तो क्षण आजही तसाच आठवतो : चौहान
मेजर ध्यानचंद यांच्या मृत्यूची घटना आठवून गजेंद्र चौहान यांनी एबीपी न्यूजला सांगितले, 'मेजर ध्यानचंद यांचा माझ्या हातात अशाप्रकारे मृत्यू झाल्याची घटना आजही माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय क्षणासारखी आहे.' चौहान म्हणाले की, 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार'चे नाव बदलून 'मेजर ध्यानचंद' यांच्या नावावर पुरस्कार देण्याची बातमी आल्यानंतर मी आज सकाळी अशोक कुमार यांना फोन केला आणि ते या बदलामुळे खूप आनंदित झाले होते.
मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावा : चौहान
गजेंद्र म्हणाले की, फोनवरील संभाषणादरम्यान, ध्यानचंदच्या मुलाने सांगितले की तो आपल्या वडिलांना 'भारतरत्न' पुरस्कारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध मंत्रालयांना पत्र लिहित आहे आणि त्यांचे प्रयत्न अजूनही चालू आहेत. आता पुन्हा एकदा भारत सरकारकडे भारतरत्नसाठी मागणार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गजेंद्र म्हणाले, 'मला असेही वाटते की मेजर ध्यानचंद सारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला 'भारतरत्न' सारखा सर्वोच्च पुरस्कार लवकरात लवकर मिळावा.
तीन वर्षांपेक्षा जास्त काळा एम्स रुग्णालयात सेवा
2 वर्षांसाठी डिप्लोमा इन क्लिनिकल टेक्नॉलॉजी (डीटीसी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, गजेंद्र चौहान यांनी सप्टेंबर 1979 ते मे 1982 पर्यंत दिल्लीच्या एम्स रुग्णालयात रेडिओग्राफर म्हणून काम केले आणि नंतर 1982 मध्ये अभिनयात नशीब आजमवण्यासाठी मुंबईला आले. त्यांना इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मिळाला आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला.
पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय स्तुत्य : चौहान
गजेंद्र चौहान म्हणतात की, हे खरे आहे की पंतप्रधान राजीव गांधी हे देशाचे एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते. मात्र, 'हॉकीचे जादूगार' मेजर ध्यानचंद हे देखील या खेळाशी संबंधित मोठे व्यक्तिमत्व आहे. अशा परिस्थितीत क्रीडा पुरस्कारांचे नाव त्यांच्या नावावर ठेवणे हे एक स्तुत्य पाऊल आहे. खेळांशी संबंधित पुरस्कार एका महान खेळाडूच्या नावावर असावा आणि पंतप्रधानांचे नाव बदलण्याचा हा निर्णय कौतुकास्पद आहे.