नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि अमित शाहांसोबत स्वतंत्र बैठक झाली आहे. आधी देवेंद्र फडणवीस त्यानंतर आशिष शेलार अमित शाह यांना भेटले. यानंतर आता उद्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप नेत्यांच्या या बैठकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप नेत्यांच्या अमित शाह यांच्या सोबतच्या स्वतंत्र बैठकांचा नेमका अर्थ काय? असा सवालही उपस्थित होत आहे.
भाजप नेत्यांची ही भेट लपवण्याचा खुप प्रयत्न केला गेला. भेटीची कोणतीही माहिती मीडियाला दिली नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आशिष शेलार यांच्या स्वतंत्र भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसकडून मात्र अशी कोणतीही भेट झाल्याचं नाकारण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लील कधी गेले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र देवेंद्र फडणवीस दुपारी 1.15 वाजता मुंबईत दाखल झाल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे. भेट झाली आहे तर ती नाकारली का जात आहे? भेटीबाबत कमालीची गुप्तता का पाळली जात आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत.
महाविकास आघाडी सरकार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुद्द्यांवर ही भेट आहे का? मात्र या मुद्द्यांवर ही भेट असती तर स्वतंत्र भेटींची गरज काय? त्यामुळे भाजप नेत्यांच्या स्वतंत्र भेटींमुळे भाजपच्या अंतर्गत मुद्द्यांवर ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात जे फेरबदल त्यानंतर भाजपमध्ये अनेक हालचाली सुरु आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी अनेक फेरबदल भाजपमध्ये होऊ शकतात, असं राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांनी सांगितलं. राज्याच्या राजकारणाबाबतही भाजपकडून अनेक चाचपण्या सुरु आहेत. मात्र जेव्हा जेव्हा गुप्त बैठका होतात तेव्हा मोठा विषय चर्चेत असतो हे आजवर दिसून आलं आहे, असं रवीकिरण देशमुख यांनी म्हटलं.
भाजप नेत्यांच्या भेटी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी ही भेट असावी. मुंबई महापालिकेवर सत्ता काबिज केली तर शिवसेनेला मोठा धक्का असेल. भाजपच्या संघटनात्मक बदलाविषयी बोलायचं तर देवेंद्र फडणवीस यांचं एवढं मोठ स्थान नाही की त्यांना तिथे चर्चेसाठी बोलवलं जाईल, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी म्हटलं.