Rajiv Gandhi Khelratna Award Renamed : राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' असे नामकरण करण्याच्या निर्णयाचे स्वागत काँग्रेसने स्वागत केलं आहे. मात्र काँग्रेसने नरेंद्र मोदी स्टेडियम आणि अरुण जेटली स्टेडियमचे नाव खेळाडूंच्या नावावर ठेवावे, अशी मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सुरुवात तर झाली आहे, तर चांगली सुरुवात करा.


हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना आदरांजली देण्याचे काँग्रेसकडून स्वागत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या क्षुल्लक राजकीय हेतूने वापरले नसते तर बरे झाले असते. मेजर ध्यानचंद यांच्या नावे होणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचे आम्ही स्वागत करतो, असं रणदीप सुरजेवाला यांनी यांनी म्हटलं. 


सुरजेवाला पुढे म्हणाले की, राजीव गांधी या देशाचे नायक होते आणि राहतील. राजीव गांधी हे कोणत्याही पुरस्कारासाठी ओळखले जात नाहीत, परंतु त्यांच्या समर्पण, विचार आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी ते ओळखले जातात. ऑलिम्पिक वर्षात, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळांच्या बजेटमध्ये 230 कोटी रुपयांची कपात केली आहे. अशा मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदी लक्ष हटवत आहेत.


स्टेडियमचे नाव देशातील खेळाडूंच्या नावे ठेवणे अपेक्षित आहे. सर्वप्रथम नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली स्टेडियमचे नाव बदला. आता पीटी उषा, सरदार मिल्खा सिंग, मेरी कोम, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांची नावे स्टेडियमला द्यावीत. तसेच खेळांशी संबंधित संस्थांचे नाव अभिनव बिंद्रा, विश्वनाथन आनंद, पुलेला गोपीचंद, लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांच्या नावावर ठेवले पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली. सुरुवात झाली आहे तर ती चांगली करा. सर्वात आधी नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली स्टेडियमचे नाव बदलून मिल्खा सिंग स्टेडियम करा. संपूर्ण देश या निर्णयाचे स्वागत करेल, असंही त्यांनी म्हटलं. 


राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; पंतप्रधानांची घोषणा


भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, ""खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने  करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल."