Sukanya Samriddhi Yojana : केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना सुरु करत असते. सरकार मुलींच्या (Girl Child) जन्मापासून त्यांचं शिक्षण आणि त्यानंतर लग्नासाठी अनेक योजना राबवत आहे. मुलींना शिक्षण आणि विकासाची पूर्ण संधी मिळावी आणि त्या स्वावलंबी बनाव्यात हा या योजनांचा उद्देश आहे. या लेखात आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती देणार आहोत. ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या लेकीसाठी एकरकमी निधी तयार करु शकता. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) असं या योजनेचं नाव आहे. देशातील मुलींचं भविष्य घडवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचं शिक्षण आणि भविष्यात लग्नाचा खर्च या तणावातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती आणि त्यात गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेऊया.


केवळ 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी खातं उघडू शकता. हे खातं तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात 250 रुपये ते 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करु शकता. मॅच्युरिटी झाल्यावर, फक्त मुलगीच खात्यातून पैसे काढू शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडू शकता. दुसऱ्यांदा दोन जुळ्या मुली असतील तर तीन मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येईल.


व्याज किती मिळेल?
या योजनेवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला वार्षिक आधारावर 7.6 टक्के व्याज दर मिळतो. जर तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेत 14 वर्षे सतत गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 22.50 लाख रुपये होईल. यानंतर, मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर, तुम्हाला एकूण 63.65 लाख रुपये मिळतील, जे तुमच्या गुंतवणुकीच्या जवळपास तिप्पट असेल. तुम्हाला एकूण 41.15 लाख रुपयांच्या व्याजाचा लाभ मिळेल.


योजनेचा मॅच्युरिटी पीरियड
या खात्याचा मॅच्युरिटी पीरियड मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी होतो, ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 14 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतरच्या सात वर्षांत, सरकार जमा केलेल्या एकूण रकमेवर व्याज जोडत राहते. अशा परिस्थितीत, या योजनेत गुंतवणूक करुन, तुम्हाला तीनपट लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तुम्ही 50 टक्केरक्कम काढू शकता आणि संपूर्ण रक्कम 21 व्या वर्षी काढू शकता.


केंद्र सरकार व्याजदरात वाढ करण्याच्या विचारात
केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत छोट्या बचत योजनेचा आढावा घेत असतं. अशा परिस्थितीत, सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीपूर्वी, अर्थ मंत्रालय या योजनांचे व्याजदर वाढवण्याची घोषणा करु शकते. या लहान बचत योजनेत व्याजदर 0.50 टक्क्यांवरुन 0.75 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. सध्या या योजनेवर 7.6 टक्के व्याजदर दिला जात आहे, जो 8.3 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.


इतर महत्त्वाच्या बातम्या