कोलकाता: पश्चिम बंगालमधील संदेशखली प्रकरण देशभर गाजत असतानाच आता येथील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हीडिओत काही पुरुष एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या महिलेचे हातपाय पकडून तिला धरुन ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन पुरुष लाकडी दांडक्याने तिला एकापाठोपाठ एक फटके मारत आहेत. यावेळी महिला वाचण्यासाठी जोरात किंचाळताना व्हीडिओत ऐकू येत आहे. तरीही तिला दांडक्याने मारहाण सुरु असल्याचे व्हीडिओत दिसत आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालमधील (West Bengal) कामरहाटी येथील असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. 


भाजपकडून (BJP) ट्विटरवर हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हीडिओत महिला मारापासून वाचण्यासाठी किंचाळताना दिसत आहे. मात्र, तिचे हातपाय बांधून ठेवल्याने तिला काहीही करता येत नाही. कामरहाटी महानगरपालिकेच्या तलाठी क्लबमध्ये हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.


तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांचे काही सहकारी आणि गुंडांनी मिळून या महिलेला मारहाण केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसकडून आपल्या पद्धतीने न्याय केला जात आहे. त्यासाठी या महिलेला मारहाण करण्यात आली. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली होती. 






आणखी वाचा


लेकाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन, गाडीवरचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं, टोईंग व्हॅनही बोलावली इतक्यात...