मुंबई: वरळी हिट अँण्ड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी थंड डोक्याने योजना आखली होती, अशी माहिती समोर आली आहे. संपूर्ण शहा कुटुंबानेच मिहीरला (Mihir Shah) वाचवण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेश शहा (Rajesh Shah) यांनीच, ,मिहीरला तू पळून जा, 'अपघात (Worli Accident) चालकाने केला आहे सांगू, असा सल्ला दिला होता. मात्र, राजेश शहा यांना सोमवारी न्यायालयाने जामीन दिला आहे. 


पोलीस चौकशीदरम्यान राजेश शहा आणि इतर कुटुंबीयांनी मिहीरला पळून जाण्यासाठी कशाप्रकारे मदत केली, याची माहिती समोर आली आहे. मिहीरने फोन करुन वडिलांना अपघाताविषयी माहिती दिली. त्यानंतर राजेश शहा यांनी मिहीरला पळून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील योजना आखली होती. राजेश शहा यांना मिहीरने ज्या बीएमडब्ल्यू गाडीने वरळीत कावेरी नाखवा यांना चिरडले, ती गाडीच नष्ट करायची होती. जेणेकरुन मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.


वरळीतील अपघातानंतर मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत दोघेही पळून गेले होते. त्यांची कार वांद्रे कलानगर येथे बंद पडली. येथूनच बिडावतने राजेश शहा यांना फोन केला. राजेश शहा यांनी सर्वप्रथम बिडावत याला अपघाताची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेण्यास सांगितले. त्यानंतर राजेश शहा घाईघाईने कलानगर येथे पोहोचले. याठिकाणी आल्यानंतर राजेश शहा यांनी फोन करुन एक टोईंग व्हॅन बोलावून घेतली. यादरम्यान राजेश शहा यांनी मिहीरच्या गाडीची ओळख कोणालाही पटू नये, यासाठी गाडीवरची नंबरप्लेट काढून टाकली. राजेश शहा हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे मिहीरच्या गाडीवर शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाणही होता. ते चिन्हही राजेश शहा यांनी गाडीवरुन झटपट काढून टाकले. यानंतर राजेश शहा टोईंग व्हॅनची वाट बघत असतानाच मुंबई पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने माग काढत गाडीपर्यंत पोहोचले आणि राजेश शहा यांची सगळी योजना फसली. 


राजेश शहा यांनी आखलेल्या योजनेनुसार अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी चालक राजऋषी बिडावत  वांद्रे येथेच थांबून राहिला होता. पोलिसांनी त्याठिकाणी आल्यानंतर बिडावत आणि राजेश शहा यांना ताब्यात घेतले. यानंतर झालेल्या चौकशीत राजेश शहा यांनी आखलेली योजना समोर आली.


मिहीर शहाच्या मुसक्या आवळण्यासाठी लूकआउट नोटीस जारी


मिहीर शहा या अपघातानंतर फरार झाला होता. तो काहीवेळ गोरेगाव परिसरातील त्याच्या मैत्रिणीच्या घरी थांबला होता, तिथे त्याने दोन तास झोप काढली. यानंतर मिहीर त्याच्या आई आणि बहिणीसह पळून गेला होता. पोलिसांनी मिहीर शहाच्या शोधासाठी सहा पथके तैनात केली आहेत. सीसीटीव्ही तसेच नातेवाईकांच्या सीडीआरनुसार त्याचा शोध सुरु आहे. त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तो परराज्यात किंवा परदेशात पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.


आणखी वाचा


'वरळी हिट अँड रन' प्रकरणात मृत पावलेली महिला जेष्ठ अभिनेत्याची सख्खी पुतणी, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, 'फाशी झालीच पाहिजे...'


VIDEO: मुलाला वाचवण्यासाठी कट आखणारे राजेश शहा 24 तासांत जामिनावर बाहेर