Weather Update : पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज
IMD Weather Forecast : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
Weather Update Today : एकीकडे देशातील काही भागात थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस पावसाची शक्यता
आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
पुढील 24 तासांत, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीसह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रचंड थंडी आहे. हिमाचल प्रदेशात यावेळी फारशी बर्फवृष्टी न झाल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये थंडी वाढत आहे. हवामान खात्याने हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये धुक्याचा इशारा जारी केला आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
महाराष्ट्रातही 'या' भागात पावसाची शक्यता
वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसासह बर्फवृष्टीचीही शक्यता
उत्तराखंडमध्ये 19 फेब्रुवारी 2024 रोजी मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवर्षाव होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :