Weather Forecast : महाराष्ट्र ते दिल्ली कशी असेल पावसाची स्थिती? 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
सध्या संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं दडी मारली आहे.
Weather Forecast : संपूर्ण देशात नैऋत्य मान्सूनचं आगमन झालं आहे. देशात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर काही ठिकाणी अद्याप पावसानं दडी मारली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार गुजरात, ओडिशा, झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार चेन्नईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चेन्नई आणि तामिळनाडू लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी हवामान खात्याने सांगितले की, पुढील तीन दिवस दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य भारतातही मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य भारतातील बहुतांश भागात मुसळधार पडण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे. त्यानुसार छत्तीसगडमध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. तर विदर्भात 5 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचवेळी पूर्व मध्य प्रदेशात 4 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. झारखंड, सिक्कीम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. यासोबतच ओडिशामध्ये 3 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. तरी औरंगाबाद जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी सुद्धा केली आहे. पण अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवलं आहे.