एक्स्प्लोर
Advertisement
व्हायरल सत्य : मोदी यावेळी वाराणसीतून निवडणूक लढणार नाहीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असा मेसेज व्हायरल होत आहे. या सर्व दाव्यांना दैनिक जागरण या वृत्तपत्राचं एक कात्रण कारणीभूत आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे मेसेज व्हायरल होत असतात आणि त्यातून विविध दावे केले जातात. सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जातोय, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा पराभव पाहता मोदी निवडणूक लढणार नाहीत, असा दावा केला जात आहे. एबीपी न्यूजने या व्हायरल मेसेजची पडताळणी केली.
या सर्व दाव्यांना दैनिक जागरण या वृत्तपत्राचं एक कात्रण कारणीभूत आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या कात्रणाच्या मथळ्यात लिहिलं आहे की, मोदी यावेळी बनारसमधून निवडणूक लढणार नाहीत. त्यानंतर असं म्हटलंय की, मोदी पाटणा किंवा अहमदाबादमधून निवडणूक लढू शकतात.
व्हायरल मेसेजचं सत्य काय?
एबीपी न्यूजने या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. दैनिक जागरण समुहाचं वृत्तपत्र आयनेक्स्टमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे वृत्त छापून आलं होतं. जे राजकीय विश्लेषकांच्या हवाल्याने दिलं होतं. मात्र हे एक राजकीय विश्लेषण आहे, याला तथ्य म्हणता येणार नाही.
मोदी वाराणसीतून निवडणूक लढतील की नाही, हे भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान मोदी 2019 ची लोकसभा निवडणूक वाराणसीतूनच लढतील, असं अमित शाह यांनी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं होतं.
त्यामुळे मोदी वाराणसीतून निवडणूक लढणार नाहीत, हा व्हायरल होणारा मेसेज खोटा असल्याचं पडताळणीत समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement