गाझियाबादमधील पत्रकाराची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू
सोमवारी रात्री गाझियाबादच्या विजयनगर परिसरात आपल्या दोन मुलींसोबत दुचाकीवरुन जात असताना पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील पत्रकार विक्रम जोशी यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान आज (22 जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवार रात्री हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भाचीची छेडछाड करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळी झाडली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, "एफआयआरमध्ये छोटू, आकाश बिहारी आणि रवी नावाच्या तीन संशयितांची नावं आहेत. तर काही अज्ञात आरोपींचाही उल्लेख केला आहे." पुराव्यांच्या आधारावर आतापर्यंत मोहित, दलबीर, आकाश, योगेंद्र, अभिषेक आणि शाकिर यांच्यासह एकूण 9 आरोपींना अटक केली आहे. तर ठाणे अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र यांना तात्काळ निलंबित केलं आहे," अशी माहिती एसएसपी कलानिधि नैथानी यांनी दिली.
सोमवारी (22 जुलै) रात्री गाझियाबादच्या विजयनगर परिसरात पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेजही समोर आलं आहे. "विक्रम जोशी आपल्या दोन मुलींसह बाईकवर जात आहेत, तेवढ्यात अज्ञात त्यांना घेरतात आणि त्यांच्यावर गोळी झाडून पसार होतात," असं या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच भाचीसोबत छेडछाड होत असल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी विजयनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यामुळे चवताळलेल्या गुंडांनी त्यांना रस्त्यात गाठलं आणि गोळीबार करुन पसार झाले.