नवी दिल्ली : शनिवारी सकाळी दिल्लीमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस पडला असून त्यामुळे दिल्लीतील रस्तेच नव्हे तर देशातलं सर्वात उत्तम विमानतळ समजल्या जाणारे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्ट (Indira Gandhi International Airport) पाण्यात गेल्याचं दिसून येतंय. दिल्ली विमानतळाची धावपट्टीच नव्हे तर विमानतळाच्या आतमध्येही पाणी साचलं असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन हे जीएमआर या खासगी संस्थेकडे आहे. या विमानतळावर गेल्यानंतर आपल्याला दिल्ली विमानतळ हे देशातील सर्वोत्तम विमानतळ असल्याचे बोर्ड पहायला मिळतात. आता याच विमानतळावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे उत्तम व्यवस्थापनेचा दावा करणाऱ्या जीएमआर कंपनीचा दावा किती फोल ठरला आहे हे दिसून येतंय.
अचानक आलेल्या पावसामुळे विमानतळावर पाणी साचलं असून प्रवाशांना झालेल्या तसदीबद्दल खेद व्यक्त करत आहोत असं दिल्ली विमानतळाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलं. थोड्याच वेळात पाणी बाहेर काढण्यात येईल असंही आश्वासन व्यवस्थापनाने दिलं आहे.
दिल्लीत गेल्या 45 वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस पडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे दिल्लीचे जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातल्या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं दिसून येतंय.
संबंधित बातम्या :