जयपूर : राजस्थानातील उदयपूर-आग्रा कँट वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यावरुन लोको पायलट आक्रमक झाले. यामुळं मारामारी, धक्काबुक्की असे प्रकार घडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार गंगापूर रेल्वे स्टेशनवर काही लोक मारहाण करत असताना दिसून येतात. ते लोक प्रवासी नसून लोको पायलट आहेत. हे लोको पायलट वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यासाठी एकमेकांसोबत भांडत असल्याचं चित्र आहे. जीआरपी उपस्थित असताना त्यांच्यासमोर लोको पायलट वाद घालत असताना पाहायला मिळतात. लोको पायलट आक्रमक असल्यानं त्यांना जीआरपीचे जवान देखील रोखू शकले नाहीत हे पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये काम करण्यासंदर्भातील दोन मंडळांचा वाद आता रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचला असल्याची माहिती आहे. मात्र, या संदर्भात निर्णय झाला नाही. एबीपी माझा या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार उदयपूर ते आगरा येथे 2 सप्टेंबर पासून वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु झाली आहे. तेव्हापासून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमध्ये यासंदर्भात वाद दिसत आहे. शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यावरुन कोटा मंडळ आणि आगरा रेल्वे मंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.
या वाद वाढताच, काही जणांनी कर्मचाऱ्यांची कपडे फाडली तर काही लोको पायलटसनी वंदे भारत एक्स्प्रेसचं नुकसान केलं.
उदयपूरहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन उत्तर पश्चिम रेल्वे अजमेर मंडल येथून सुटते. त्यानंतर ती पश्चिम मध्य रेल्वे कोटा मंडलमधून जाते. ती उत्तर मध्य रेल्वे मंडळ आगरा येथे पोहोचते. 2 सप्टेंबर रोजी जेव्हा कोटा येथू गंगापूर येथे पोहोचली तेव्हा रेल्वे मंडळाचे लोको पायलट ट्रेनला आगरा येथे नेण्याची इच्छा होती. त्याला गंगापूर सिटीच्या लोको पायलटनं विरेध केला. यानंतर दोन्ही मंडळाच्या लोको पायलटमध्ये वाद झाला होता.
रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनुसार जेव्हा कोणती नवी ट्रेन सुरु होते. तेव्हा त्यात वर्किंग मिळाल्यास प्रमोशन मिळतं आणि नव्या भरतीमध्ये संधी मिळते. दोन्ही मंडळामध्ये वंदे भारत एक्स्प्रेस कोण चालवणार यावरुन सुरु असलेल्या वादाचा भडका उडाल्याचं या व्हिडीओच्या निमित्तानं समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :