चंदीगड : हरियाणाच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसनं काल त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत पैलवान विनेश फोगाटला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात  आलेली आहे.बिहारचे माजी मुख्यमंत्री राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या जावयावर देखील काँग्रेसनं विश्वास टाकला आहे. काँग्रेसनं रेवाडी विधानसभा मतदारसंघातून चिरंजीव राव (Chiranjeev Rao

  ) यांना उमेदवारी दिली आहे. चिरंजीव राव हे लालू प्रसाद यादव यांचे जावई आहेत. 



चिरंजीव राव हे लालू प्रसाद यादव यांची कन्या अनुष्का यादव हिचे पती आहेत. चिरंजीव राव यांचे वडील कॅप्टन अजय सिंह यादव हे काँग्रेसचे हरियाणातील दिग्गज नेते आहेत. अजय सिंह यादव हे काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे अध्यक्ष आहेत. हरियाणा सरकारमध्ये त्यांनी यापूर्वी अर्थ, महसूल, सिंचन, सार्वजनिक बांधकाम, कारागृह, वीज, वन आणि समाज कल्याण विभागाचं मंत्रिपद भूषवलं आहे. 


चिरंजीव राव काय म्हणाले?


उमेदवारी मिळाल्यानंतर चिरंजीव राव यांनी म्हटलं की मला इथल्या समस्या माहिती आहेत. आम्ही सध्या सत्तेत नाही मात्र तुम्ही आशीर्वाद दिलात तर सत्तेत येऊ आणि तुमची राहिलेली कामं पूर्ण करु, असं ते म्हणाले.  


अजय सिंह यादव हे 1991 पासून 2014 पर्यंत पाचवेळा रेवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या रणधीर सिंह यांनी पराभूत केलं होतं. त्यावेळी रणधीर सिंह यांना 81 हजार 103 आणि अजय सिंह यादव यांना  31 हजार 103 मतं मिळाली होती. तर, भारतीय लोकदलाचे सतीश यादव यांना 35 हजार 637 मतं मिळाली होती.  


यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजय यादव यांचा मुलगा असलेल्या चिरंजीव राव यांनी विजय मिळवला होता. चिरंजीव राव यांनी भाजपच्या सुनील कुमार यांचा पराभव केला होता. चिरंजीव राव यांना 43 हजार 870 मतं तर भाजपच्या सुनील कुमार यांना 42 हजार 553 मतं मिळाली होती. तर, अपक्ष उमेदवार रणधीर सिंह यांना 36 हजार 778 मतं मिळाली होती.   


इतर बातम्या : 


'आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतंय, अशी स्थिती', राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांना टोला


भाजपच्या उज्वल भविष्याकरता नितीन गडकरी मैदानात, महायुतीचे सरकार आणण्याकरता महिनाभर वेळ देणार: चंद्रशेखर बावनकुळे