मुंबई : परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. 'वंदे भारत मिशन' असं या अभियानाचं नाव आहे. विमान आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणलं जाणार आहे. यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत. एअर इंडियाचं विमान आज अबूधाबीवरुन 200 भारतीयांना घेऊन येणार आहे. परराष्ट्रातून उड्डाण होण्याआधी सर्व प्रवाशांची मेडिकल स्क्रीनिंग होणार आहे.

दरम्यान, मायदेशी परतीच्या प्रवासासाठी या नागरिकांना काही मोबदलाही द्यावा लागणार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

एकूण 64 विमानांपैकी 10 विमानं यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलिपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये उड्डाण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक बंद झाल्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात हे भारतीय अडकून पडले होते.

विमानतळावर तयारी पूर्ण
कोरोना व्हायरसमुळे देशभर लावलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या आगमनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हवाई आणि समुद्रमार्गे होणाऱ्या या अभियानाची सुरुवात आजपासून (7 मे) होईल. टप्प्याटप्प्याने या भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारने एक तपशीलवार प्लॅन आखला आहे. विमानं आणि नौदलाच्या जहाजातून या भारतीयांना देशात आणलं जाणार आहे. एअर इंडियाचं विमान 200 नागरिकांना घेऊन अबूधाबीवरुन उड्डाण करेल आणि केरळच्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. या अभियानाच्या पार्श्वभूमवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळावर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली आहे.


जवळपास 15000 भारतीयांना परत आणण्याची योजना
'वंदे भारत मिशन' नावाच्या या अभियाना आखाती देशांपासून मलेशियापर्यंत, ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत विविध देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणलं जाणार आहे. यासाठी एअर इंडिया 12 देशांमधून सुमारे 15000 भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 मे पर्यंत 64 उड्डाणं होतील. 13 मे नंतर खासगी विमान कंपन्यांही भारतीयांना परत आणण्याच्या मोहीमेत सामील होऊ शकतात. पहिल्या दिवशी परदेशातील विविध ठिकाणांहून 10 उड्डाणं होती. आज कोचीसह कोळीकोड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद आणि श्रीनगरमध्ये विमानं दाखल होती. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळलेली नाहीत, त्यांनाच देशात परत आणलं जाणार आहे.


याशिवाय मायदेशात पोहचल्यानंतर त्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. भारतात आल्यानंतरही त्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानुसार त्यांना पुढचे 14 दिवस क्वॉरन्टाईन राहावं लागणार आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट होणार आहे. शिवाय राज्य सरकारांना सुद्धा अशा नागरिकांबाबत जी काळजी घ्यायची आहे, त्याबाबतचे निर्देश केंद्राने दिले आहेत.


विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी विमानं, नौदलाची जहाजं सज्ज, 7 मे पासून टप्याटप्यानं सुरुवात