नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक विशेष गाड्या चालवण्यात येत आहे. भविष्यकाळात केंद्र सरकार अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 17 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेशन कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनमुळे बस आणि कार चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांचे प्रश्न सोडविण्यासठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले.
गडकरी म्हणाले, सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास येईल असा अंदाज आहे. पण यासाठीही आधी नियमावली आखून देण्यात येईल आणि त्यानंतरच सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू करण्यात येईल. कोरोना विरुद्धच्या या लढाईत या लढाईत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास नक्की यशस्वी होऊ.
देशात 40 दिवसांनंतर शुक्रवारी पहिली रेल्वे चालवण्यात आली. 1200 कामगारांना घेऊन जाणारी विषेश ट्रेन झारखंडमधील हतिया येथे पोहोचली. हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून ही विशेष गाडी सोडण्यात आली होती. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन या वेळी करण्यात आलं. या ट्रेनमधील सर्व कामगारांची जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्येही देशात विशेष ट्रेन; 1200 मजुरांना घेऊन पहिली ट्रेन रांचीत दाखल
Lockdown | पनवेलमधून मजुरांसाठी विशेष ट्रेन, मध्यप्रदेशातील 1200 मजुरांची विशेष रेल्वेनं रवानगी