नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात विदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारनं योजना आखली आहे. टप्याटप्यानं या भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक तपशीलवार प्लॅन आखला आहे. विमानं आणि नौदलाच्या जहाजातून या भारतीयांना देशात आणलं जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून अशा नागरिकांची सूची तयार करण्याचं काम सुरु आहे.


मायदेशी परतीच्या प्रवासासाठी या नागरिकांना काही मोबदलाही द्यावा लागणार आहे. 7 मे पासून टप्पाट्प्यानं या मोहीमेला सुरुवात होणार आहे. परराष्ट्रातून उड्डाण होण्याआधी सर्व प्रवाशांची मेडिकल स्क्रीनिंग होणार आहे. शिवाय ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळत नाहीत, त्यांनाच देशात परत आणलं जाणार आहे.


याशिवाय मायदेशात पोहचल्यानंतर त्यांना आरोग्य सेतू अॅपड डाऊनलोड करणं बंधनकार असणार आहे. भारतात आल्यानंतरही त्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानुसार त्यांना पुढचे 14 दिवस क्वॉरंन्टाईन राहावं लागणार आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट होणार आहे. शिवाय राज्य सरकारांना सुद्धा अशा नागरिकांबाबत जी काळजी घ्यायची आहे, त्याबाबतचे निर्देश केंद्रानं दिले आहेत.


देशातील कोरोनाची सद्यस्थिती


देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून आज 42 हजार 533 वर पोहोचली आहे. यापैकी 29 हजार 453 अॅक्टिव्ह केसेस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11000 पेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण 11707 रूग्ण बरे झाले आहेत आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 27.52 टक्के आहे.


कोरोनाच्या कोणत्या राज्यात किती केसेस?


देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 12 हजार 974 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 548 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात 1583, अंदमान-निकोबारमध्ये 33, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 43, बिहारमध्ये 503, चंदिगडमध्ये 94, छत्तीसगडमध्ये, 57, दिल्लीत 4549 आणि गोव्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र, आता गोव्यातील सर्व रुग्ण बरे झाले आहेत.


याशिवाय गुजरातमध्ये 5428, हरियाणामध्ये 442, हिमाचल प्रदेशात 40, जम्मू-काश्मीरमध्ये 701, झारखंडमध्ये 115, कर्नाटकात 614, केरळमध्ये 500, लडाखमध्ये 41, मध्य प्रदेशात 2846, मणिपूरमध्ये 2, मेघालयामध्ये 12, मिझोरममधील 1, ओडिशामध्ये 162, पाँडेचरीमध्ये 8, पंजाबमध्ये 1102, राजस्थानमध्ये 2886, तामिळनाडूमध्ये 3023, तेलंगणामध्ये 1082, त्रिपुरामध्ये 16, उत्तराखंडमध्ये 60, उत्तर प्रदेशात 2645 आणि पश्चिम बंगालमध्ये 963 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.


संबंधित बातम्या




Lockdown 3 | घरी परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची मोठी घोषणा