Fire in Navratri Pandal : संपूर्ण देशभरात नवरात्रीचा (Navratri 2022) उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दुर्गापुजा (Durga Puja) जल्लोषात पार पडत आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील भदोही (Bhadohi) मध्ये नवरात्रीचा (Navratra)  मंडप घालण्यात आला होता. याच मंडपात रविवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 64 जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आगीत होरपळून आतापर्यंत दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर वाराणसी (Varanasi) आणि प्रयागराज (Prayagraj) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


भदोहीमध्ये दुर्गा पुजेदरम्यान मंडपाला आग लागली. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. ज्यावेळी मंडपात आग लागली त्यावेळी मंडपात तब्बल 150 भाविक उपस्थित होते. आग इतकी भीषण होती की, त्यामध्ये जवळपास 64 भाविक होरपळले. तर आगीत होरपळल्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. उपस्थितांपैकी 40 टक्क्यांहून अधिक भाविक आगीत होरपळले आहेत. यामध्ये अनेकजण 30 ते 40 टक्के भाजले आहेत. तर काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.   






मुख्यमंत्री योगींकडून शोक व्यक्त 


दुर्गा पुजेदरम्यान लागलेल्या आगीमुळे तब्बल 64 जण होरपळले आहेत. या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच, होरपळल्यामुळे जखमी असलेल्यांच्या उपचारासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती सीएमओद्वारे ट्वीट करुन देण्यात आली आहे. सीएमओनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "भदोही जिल्ह्यातील औरई येथील दुर्गा पंडालला लागलेल्या आगीच्या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत."


यासोबतच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आग लागल्याची सूचना मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, तात्काळ बचावकार्यही सुरु करण्यात आलं. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून होरपळून जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kanpur Road Accident : कानपूरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 25 जण जागीच ठार