मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या कर्नाटकात पोहोचली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील नंजनगुड येथील प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केले. यादरम्यान मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. यावेळी त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. भाषणानंतर त्यांनी भर पावसातच कार्यकर्त्यांची देखील भेट घेतली. राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये राहुल गांधी पावसात रॅलीला संबोधित करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी भर पावसात देखील आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी भाषण एकण्यासाठी उपस्थित कार्यकर्ते देखील त्यांच भाषण ऐकत थांबले. अशा पावसात देखील कार्यकर्त्यांनी मैदान सोडलं नाही. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. नदीसारखी ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत होईल. या नदीत तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम आणि बंधुभाव दिसतील. हा प्रवास थांबणार नाही. आता बघा, पाऊस येतोय, पावसाने देखील यात्रा थांबवली नाही. उन, वादळ देखील ही यात्रा थांबवू शकणार नाहीत. देशात द्वेष पसरवणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या विरोधात उभे राहणे हा या यात्रेचा उद्देश आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आम्हाला भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही.
दरम्यान, या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. कर्नाटकातील खादी ग्रामोद्योग केंद्राला त्यांनी भेट दिली. 1927 आणि 1932 मध्ये महात्मा गांधींनीही येथे भेट दिली होती. स्वातंत्र्यसैनिकाची हत्या करणाऱ्या विचारसरणीने गेल्या आठ वर्षांत विषमता आणि विभाजनाला जन्म दिला अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. 30 सप्टेंबर रोजी ते तामिळनाडू राज्यातील गुडालूर येथून कर्नाटकातील गुंडलुपेट येथे पोहोचले. पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार असल्याने कर्नाटकसह काँग्रेसची यात्रा निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. ही यात्रा पहिल्यांदाच भाजपशासित राज्यातून जात आहे.
कर्नाटकात पोस्टर्स फाडले
यात्रेच्या कर्नाटक प्रवेशापूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले होते. मात्र चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट भागात अनेक पोस्टर्स फाडण्यात आले.