Uttar Pradesh Election Result 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी 11 मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभूत मंत्र्यांच्या यादीत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचाही समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवार डॉ. पल्लवी पटेल यांनी त्यांचा 7337 मतांनी पराभव केला. पल्लवी पटेल या अपना दलच्या (कमेरावादी) राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. 


उत्तर प्रदेशमधील ऊस मंत्री सुरेश राणा हे शामली जिल्ह्यातून थानाभवन मतदारसंघातून पराभूत झाले आहे. समाजवादी पक्षाने युती केलेल्या राष्ट्रीय लोकदलच्या अश्रफ अली खान यांनी त्यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर, बरेली जिल्ह्यातील बहेडी विधानसभा मतदारसंघातून राज्यमंत्री छत्रपाल सिंह गंगवार यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार अताउर्रहमान यांनी 3355 मतांनी पराभव केला. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ग्रामविकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह हे प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या राम सिंह यांच्याकडून 22 हजार मतांनी पराभूत झाले. राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय चित्रकूट मतदारसंघातून हे समाजवादी पक्षाचे उमेदवार अनिल कुमार यांच्याकडून 20 हजार मतांनी पराभूत झाले. 


राज्यमंत्री आनंद शुक्ला यांना बलियातील बैरियातील समाजवादी पक्षाचे जयप्रकाश अंचल यांनी 12 हजार 951 मतांनी पराभव केला. बलिया जिल्ह्यातील फेफना मतदारसंघातून क्रीडा मंत्री उपेंद्र तिवारी यांना समाजवादी पक्षाचे उमेदवार संग्राम सिंह यांनी 19,354 मतांनी धूळ चारली. 


उत्तर प्रदेशमधील रणवेंद्र सिंह धुन्नी यांना 25,181 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. औरिया जिल्ह्यातील दिबीयापूर मतदारसंघातून राज्यमंत्री लाखन सिंह यांना अवघ्या 473 मतांनी पराभव स्वीकारवा लागला. समाजवादी पक्षाचे प्रदीप कुमार यादव यांनी त्यांचा पराभव केला. उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार माता प्रसाद पांडेय यांनी इटवा मतदारसंघातून राज्याचे मंत्री सतीश द्विवेदी यांचा 1662 मतांनी पराभव केला. गाझीपूर मतदारसंघातून राज्यमंत्री संगीता बलवंत यांना 1692 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha