BSP Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे. 


उत्तर प्रदेशची सत्ता एकहाती खेचणाऱ्या बसपाच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीत बसपाला मागील मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने बसपासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. मात्र, बसपाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणातून बसपा मुख्य पटलावरून अदृष्य राहिले असल्याचे दिसून आले. बसपा प्रमुख मायावती यादेखील प्रचारात फारशा सक्रिय राहिल्या नाहीत. त्यामुळे बसपाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची चर्चा होती. 


आधीची कामगिरी कशी होती?


बसपाने उत्तर प्रदेशच्या 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाने 164 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 67 जागांवर विजयी झाले होते. त्यावेळी समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशाच्या सरकारमध्ये होते. मात्र, मुलायमसिंह यादव आणि काशीराम यांच्यात झालेल्या वादामुळे बसपाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बसपाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. या बसपा-भाजपच्या सरकारमध्ये मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या. पुढे मायावती यांनी भाजपसोबतची आघाडी मोडली. 


त्यानंतर 1996 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बसपाने 67 जागांवर विजय मिळवला होता. तर, 2002 च्या निवडणुकीत त्यांनी 401 जागांवर निवडणूक लढवून 98 जागांवर विजय मिळवला होता. 2007 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने 206 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. मायावती यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाला फक्त 80 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेत बसपाला मोठा फटका बसला. बसपाला अवघ्या 19 जागांवर विजय मिळवता आला. 


काशीरांम यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती (DS4)ही संघटना 1981 मध्ये स्थापन केली होती. त्यानंतर पुढे 1984 काशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. बसपाने आपल्या स्थापनेनंतर सुरुवातीला पराभव नंतर दखल आणि तिसऱ्या वेळेस विजय असे सूत्र काशीराम यांनी मांडले होते. त्यानुसार बसपाने काही निवडणुका लढवल्या. काशीरामदेखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. काशीराम यांनी 1988 मध्ये व्ही. पी. सिंह आणि 1989 मध्ये राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा