PM Modi Gujrat Visit : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा गुरुवारी निकाल लागला. यामध्ये चार राज्यात भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मुसंडी मारली आहे. त्यानंतर लगेच आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान आज तिथे एक भव्य रोड शो करणार आहेत, ज्यामध्ये 4 लाख लोक सहभागी होतील, असा दावा केला जात आहे.


कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा कार्यक्रम


पंतप्रधान मोदी हे सकाळी 10 वाजता दिल्लीहून अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते विमानतळावरुनच रोड शोला सुरुवात करतील. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांचा काफिला 1 तासात 9 किलोमिटरचे अंतर कापून सकाळी 11.15 वाजता गांधीनगरमधील भाजप प्रदेश मुख्यालय कमलम येथे पोहोचेल. पंतप्रधानांच्या या रोड शोमध्ये चार लाख लोक जमतील असा दावा भाजपने केला आहे.


कोरोनाच्या संकटामुळे गुजरातमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी भाजप राज्य संघटनेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, रस्त्याच्या कडेला मोठमोठे पोस्टर बॅनर लावण्यात आले आहेत. संपूर्ण मार्गात भगवे झेंडे लावले आहेत. पंतप्रधानांच्या मार्गात सुमारे 50 टप्पे तयार करण्यात आले आहेत.


पंतप्रधान मोदींची सुरक्षा


पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी 4 आयजी-डीआयजी दर्जाचे अधिकारी, 24 डीसीपी, 38 एसीपी, 124 पीआय, 400 पीएसआय आणि 5 हजार 550 पोलीस तैनात असतील. त्याचवेळी, रोड शोनंतर पंतप्रधान मोदी कमलममध्ये राज्य संघटनेची बैठक घेऊन, निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करतील. दरम्यान, अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानावर सायंकाळी 5 वाजता पंचायत परिषदेचा कार्यक्रम असून, त्यात दीड लाखांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्चला पंतप्रधान मोदी रक्षा शक्ती विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. गुजरात सरकारच्या खेळ महाकुंभाची सुरुवात करतील. मात्र, या सर्व कार्यक्रमांचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे चार राज्यांतील विजयाची लाट गुजरातपर्यंत नेणे, कारण गुजरातमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.


भाजप मिशन गुजरातमध्ये व्यस्त 


गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. याठिकाणी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षाला कडवी टक्कर मिळाली होती. मात्र, यावेळी मोदींना काँग्रेसला एकही संधी द्यायची नाही. त्यामुळे पाच राज्यांतील निवडणुका संपताच भाजपने गुजरातमध्ये मिशन सुरु केले आहे.