Punjab Election Result : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल यायला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप जवळपास 60 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. तर काँग्रेस पंजाबमध्ये 18 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 9 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, महत्वाची माहिती म्हणजे पंजबमधील दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि विद्यमान मुख्यमंत्री असणारे चरणजीत सिंह चन्नी हेही सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. तसेच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे देखील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह हे देखील पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सोनू सूदची बहिण मालविका सूद देखील पिछाडीवर आहे. ती काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाचा विचार करता सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मोठी जबाबदारी असून या निवडणुकीसाठी तेच पक्षाचा चेहरा आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चमकोर साहिब आणि भदौर अशा दोन ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून उभे आहेत. तर यंदा एक्झिट पोलमध्ये विजयी आप पक्षाचा मोठा चेहरा म्हणजे भगवंत मान हे धुरी मतदार संघातून उभे आहेत.
पंजाबमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिब
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौर
नवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्व
विक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्व
भगवंत मान (आप) - धुरी
कॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहर
प्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबी
सुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबाद
सुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानक
मालविका सूद (काँग्रेस) - मोगा