UP Election 2022 : एक मुख्यमंत्री, ज्यांचं कुटुंब उत्तराखंडच्या डोंगर कपारीत राहातं, ज्यांची बहिण फुलं विकून संसार चालवते. एक मुख्यमंत्री, ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी घरं सोडलं. एक मुख्यमंत्री, ज्यांनी हिंदूंसाठी केलेल्या आंदोलनात तुरुंगवास भोगला, ज्यांनी उत्तर प्रदेशला आपलं कुटुंब मानलं, एक मुख्यमंत्री, ज्यांच्या कार्यकाळात गंगेत प्रेतं तरंगली, त्यांच्याच कार्यकाळात सर्वात मोठं स्थलांतर झालं. एक मुख्यमंत्री, ज्यांच्या कार्यकाळात हायवेवरही लढाऊ विमानं उतरली. एक मुख्यमंत्री, जे बनले हिंदुत्वाचे सर्वात मोठे पोस्टर बॉय. होय, आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल बोलतोय. 


जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत असतो, तेव्हा त्या कार्यक्रमात त्यांचं कुटुंब उपस्थित असतं. पण योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा त्याला अपवाद होता. कारण, जाणून घेण्यासाठी काही वर्ष मागं जावं लागेल, तेही उत्तराखंडमध्ये..


उत्तरप्रदेश आणि आताचा उत्तराखंडमधला पौडी गढवाल जिल्हा. इथंच पांचूर गावात एका फॉरेस्ट रेंजरच्या घरात योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचं योगी होण्यापूर्वीच नाव होतं अजय सिंह बिष्ट. वडिलांचं नाव आनंद सिंह बिष्ट तर आईचं नाव सावित्री देवी. सात भांवडांमध्ये योगी पाचवे होते. योगींना तीन मोठ्या बहिणी तर एक मोठा भाऊ आणि दोन छोटे भाऊ आहेत.


महंत अवैद्यनाथ यांच्या सहवासात
वयाच्या 21 व्या वर्षांपर्यंत योगींची ओळख अजय सिंह बिष्ट अशीच होती. अजय बिष्ट यांचं गढवालमध्येच दहावी पर्यंतचं शिक्षण झालं. 1989 साली ऋषीकेशमध्ये बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर पदवी शिक्षणसाठी बाहेर पडले. त्याच काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले. राम मंदिर आंदोलनामुळे अंत्यत प्रभावित झालेले अजय बिष्ट गोरखपूरला पोहोचले आणि गोरखपूरच्या गोरखनाथ मठाचे महंत अवैद्यनाथ यांच्या सहवासात आले.


हिंदुत्वानं प्रभावित झालेले अजय बिष्ट यांना महंत अवैद्यनाथांनी त्यांचा उत्तराधिकारी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यासाठी अजय बिष्ट यांना कुटुंबियांची परवानागी घ्यायची असते. त्यामुळे अजय बिष्ट घरी जातात. पण आपल्या आईला ते संन्यासी होणार आहेत असं सांगत नाहीत. गोरखपूरला पुढचं शिक्षण होणार आहे. तिथंच नोकरीचा विचार आहे असं सांगून अजय बिष्ट गोरखपूरला परत येतात. आणि गोरखनाथ मठाचे उत्तराधिकारी बनतात.


मुलगा संन्याशी झाला हे बापाला सहा महिन्यांनी समजलं
आपला मुलगा संन्यासी झालाय, तो योगी झालाय. त्यानं घर-दारं त्याग केलंय हे सगळं योगींच्या कुटुंबियांना कळतं पण सहा महिन्यानंतर. इकडे त्यांच्या जन्म दाखल्याहून वडिलांचं नावंही काढलं. तिथं त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ यांचं नाव आलं. त्यांचं नाव झालं...योगी आदित्यनाथ.


मंहत अवैद्यनाथ यांनी योगींना आपल्या धार्मिक उत्तराधिकारी तर केलंच होतं पण त्यापुढे जात अवैद्यनाथांनी योगींना राजकीय वारसदारही केलं. ज्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातून मंहत अवैद्यनाथ खासदार होते, त्याच मतदारसंघातून 1998 ला योगी आदित्यनाथ यांना संधी दिली. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी भाजपच्या तिकीटावर योगी आदित्यनाथ खासदार झाले. 


हिंदू युवा वाहिनीची स्थापना
सन 1999 साली झालेल्या निवडणुकीतही योगी जिंकले. पण, मतांमधला फरक कमी झाला होता. त्यामुळेच योगींनी जनसंपर्क वाढण्यासाठी 2002 साली हिंदू युवा वाहिनी स्थापन केली. या संघटनेचे सदस्य वाढू लागले आणि त्याचा प्रभाव 2004 आणि 2009 च्या लोकसभा विजयात दिसून आला. 


हिंदू युवा वाहिनीच्या सदस्यांमुळे 2009 साली योगीचा विजय 2 लाख मतांच्या फरकानं झाला. 2014 मध्येही या अंतरानं योगींनी विजय मिळवला आणि पाचव्यांदा संसदेत पोहोचले. भाजप केंद्रात सत्तेत आली होती. मोदींसोबतच योगींच्याही नावाची चर्चा देशभरात होती. पण, त्याच काळात विधानसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. तिथं योगींनी जोरदार प्रचार केला. पण, पक्षाला यश आला नाही.


उत्तर प्रदेशात अखिलेश सरकार सतत वादात अडकत होतं. त्याचाच फायदा घेत 2016 साली योगींना उत्तर प्रदेशात पाठवण्याची तयारी सुरु झाली आणि 2017 साली जेव्हा निवडणुका लागल्या स्टार प्रचारक बनले योगी आदित्यनाथ.


वादग्रस्त धार्मिक वक्तव्यांमुळे योगी आधीच देशभरात प्रसिद्ध होते. 2017 सालच्या प्रचारातही हेच चित्र होते. लव्ह जिहाद, हिंदू मुस्लिम, रोडरोमिओ, धर्मांतर, गोवंश हत्या...अशा सगळ्या विषयांवर योगींचा प्रचार सुरु होता..आणि त्याला सोबत होती मोदींच्या करिष्म्याची. या सगळ्यांचा फायदा झाला भाजपला झाला. 


उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार
भाजपानं राम मंदिर आंदोलनानंतर मिळवलेल्या 211 जागांचा विक्रम मोडला आणि 2017 साली थेट 312 जागा जिंकल्या तर भाजपच्या नेतृत्वात एनडीएनं 325 जागा जिंकल्या. विक्रमी बहुमताच्या जोरावर 19 मार्च 2017 ला योगी आदित्य़नाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 


इकडे योगी राजयोगी बनले अन् लखनऊच्या मुख्यमंत्री निवसस्थानी पोहोचले. पण, त्यांचे कुटुंबिय मात्र उत्तराखंडमध्ये होते, त्यांनी आपलं गावं सोडलं नाही. तिकडे गढवाल जिल्ह्यात त्यांची बहिण एक छोटं फुलाचं दुकान चालवते. त्यांचं कुटुंब त्याच दुकानातून मिळालेल्या पैशांवर उदरनिर्वाह करतं. यांचं राहणीमान पाहून कुणाला विश्वास बसणार नाही की यांचा भाऊ एका राज्याचा मुख्यमंत्री आहे.


संन्यासी झाल्यानंतर योगी घरी यायचे, आपल्या बहिणीकडेही जायचे पण, तेही संन्यासी म्हणूनच. जितका साधेपणा योगींच्या कुटुंबियांमध्ये होता, तितकाच मोठा संघर्ष योंगीसमोर होता..


मुख्यमंत्री होताच योगींनी कामांचा झपाटा लावला. आधिकाऱ्यांना धारेवर धरणारे योगी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकदा दिसलेत. त्याचबरोबर आपल्या वक्तव्यामुळे वादावर अडकलेले योगीही देशानं पाहिलेत. उन्नाव, हाथरसच्या घटनाही यांच्या काळात झाला आणि धर्मांतरचा कायदाही यांच्या विधीमंडळात पास झाला. कोरोना काळात गंगेत वाहणारी प्रेतंही यांच्या ढाळलेल्या आरोग्य यंत्रणेचा पुरावा देत होते. पण, तरीही हिंदुत्वाच्या समोर हे सगळे मुद्दे मागे पडले.


योगींच्या काळात फिल्मी स्टाईलनं गुन्हेगारांचं एन्काऊंटर्स झाले. त्यामुळे टीका झाली आणि चर्चाही. पण, सरकार खरं वादात सापडलं. ती घटना होती लखीमपूर खेरीची. शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलानं चिरडलं. विरोधकांनी मोदीसह योगी सरकारला धारेवर धरलं.


कुठे आहेत चार वर्ष विरोधक असं काहीसं चित्र सुरुवातीला असतानाच योगींसमोर अखिलेश नावाचं आव्हान उभं ठाकलंय. आताही प्रचार विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यावंर होतोय. इथंही जातीय समीकरणांचाच विचार होतोय. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यासमोर आव्हानं आहेत. त्यामुळे 10 मार्चलाच कळेल की योगींचा मुक्काम..लखनऊ की गोरखपूर.


संबंधित बातम्या :