नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने RRB-NTPC आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या श्रेणी-1 ची भरती परीक्षेच्या निकालावरून नाराज झालेल्या परीक्षार्थींनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक स्वरुप प्राप्त झाल्याचं दिसून येतंय. त्यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परीक्षार्थींनी अहिंसक मार्गाने आंदोलन करावं असं आवाहन केलं आहे.
या तरुण आंदोलकांना आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही या देशाची आणि तुमच्या कुटुंबाची आशा आहात. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात आणि सत्याच्या बाजूने मी तुमच्या सोबत आहे आणि कायमच असेन. मात्र हिंसाचार हा आपला मार्ग नाही. अहिंसक मार्गाने तुम्ही जर स्वातंत्र्य मिळवू शकता तर तुमचा हक्क का नाही?"
यूपी आणि बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या युवकांना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यासंबंधीचे काही व्हिडीओही सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.
परीक्षार्थींच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी समिती स्थापन
रेल्वे मंत्रालयाने RRB-NTPC आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या श्रेणी-1 ची भरती परीक्षेला स्थगिती दिली आहे. भरती परीक्षेच्या निकालानंतर नाराज असलेल्या परीक्षार्थींच्या तक्रारींच्या सुनावणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या निकालावर नाराजी व्यक्त करत आंदोलन केले होते. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला होता.
RRB-NTPC विभागाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी याविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले होते. बिहारमध्ये दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलनही केले होते. त्याशिवाय काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवरही ताबा मिळवला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला. रेल्वेने जाहीर केलेल्या निकालात घोळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
मंगळवारी सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण बिहारमधील इतर भागांमध्येही पसरले. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. RRB-NTPC च्या परीक्षेचा निकाल 14-15 जानेवारी रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. एक कोटी 40 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या :