वॉशिग्टन : भविष्यात अफगाणिस्तान शांत आणि स्थिर राहण्यातच भारत आणि पाकिस्तान तसेच रशिया, चीन, तुर्की या देशांच्या हिताचं असल्याचं वक्तव्य अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं आहे. प्रादेशिक हितसंबंध गुंतलेल्या या देशांनीच अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करावेत, तेच त्यांच्या फायद्याचं असल्याचं ज्यो बायडेन यांनी सांगितलं. 


या प्रदेशातील देशांनी, विशेषत: भारत आणि पाकिस्तानने या युद्धग्रस्त देशात शांतता प्रस्थापित कशी करता येईल, स्थिरता कशी निर्माण करता येईल याकडे लक्ष द्यावे असं आवाहन अमेरिकन अध्यक्षांनी केलं आहे. या देशांचे हितसंबंध अफगाण प्रश्नात गुंतल्याने त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. 


अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर 100 दिवसांच्या आतच ज्यो बायडेन यांनी बुधवारी अमेरिका अफगाणिस्तानमधून आपले सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा केली. ही प्रक्रिया येत्या 11 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या अमेरिकेचे 2,500 ट्रुप्स अफगाणिस्तानमध्ये आहेत. ओबामा प्रशासनाच्या काळात ही संख्या एक लाख इतकी होती. 


 




व्हाईट हाऊसचे  सेक्रेटरी जेन साकी म्हणाले की, अमेरिका या भागातून जरी आपले सैन्य माघारी घेत असेल तरी अफगाणिस्तानच्या सरकारसोबत सहकार्य आणि या देशातील मानवतावादी कार्य सुरूच राहणार आहे. 


अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लादेनचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले होते. या घटनेला आता 20 वर्षे झाली आहेत. या देशातील सैन्य माघारी घेऊन आपण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या युध्दाची शेवट करतोय असं अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :