वॉशिग्टन : Johnson & Johnson ची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर अमेरिकेने या लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती आणली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचं अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलंय.


Johnson & Johnson ची लस घेतल्यानंत केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही कमी होत आहेत अशी तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक आहे असं प्रशासनाने सांगितलं आहे. अमेरिकेत Johnson & Johnson च्या 68 लाख लसींचे डोस देण्यात आले असून आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही. 


या घटनेनंतर Johnson & Johnson च्या लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे. पण या स्थगितीचा परिणाम अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर होणार नसून मॉडर्ना आणि फायझर या इतर दोन लसींचा वापर सुरूच राहिल असं फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या तक्रारींची पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतरच या लसीचा वापर करायचा की नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय. 


ब्रिटनमध्ये  Oxford-AstraZeneca वापरावर बंदी
ब्रिटनमध्ये  Oxford-AstraZeneca ची कोरोनाची लस घेतल्यानंतर सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आल्यानंतर आता या लसीचा लहान मुलांवर वापर करण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. ऑक्सफर्डने ही माहिती दिली असून या लसीच्या डोसनंतर काही लोकांच्या रक्तात गाठी झाल्याच्या शक्यतेवर आता संशोधन सुरू असल्याचं स्पष्ट केलंय.


अमेरिकेतली फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशन ही संस्था कोणत्याही लसीच्या वापराला परवानगी देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. कोरोनाच्या लसीला परवानगी देताना ती लस सुरक्षित आहे का आणि किती प्रभावी आहे हे प्रामुख्याने पाहिलं जातं.


फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या सल्लागार समितीने फेब्रुवारी महिन्यात जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीच्या सिंगल शॉटच्या वापराला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. या  लसीच्या केवळ एका डोसमुळे कोरोना पासून संरक्षण मिळतो असा दावा कंपनीने या आधीच केला होता.


अमेरिकन लस निर्मीती कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनने दावा केला होता की त्यांची लस ही अमेरिकेत 72 टक्के तर जगभरात 66 टक्के प्रभावी आहे. गंभीर आजारासंबंधी विचार केला तर या कंपनीची लस ही 85 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. 


महत्वाच्या बातम्या :