नवी दिल्ली : येत्या 7 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी अवघे चार दिवस उरले असताना आता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता परीक्षार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
देशात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं संकट वाढत असताना परीक्षार्थ्यांना दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करून हॉटेलमध्ये राहावे लागेल. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असून त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली आहे. देशभरातून जवळपास 9,200 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
असं आहे यूपीएससीचं वेळापत्रक
यूपीएससी मुख्य परीक्षा 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. या तारखांना यूपीएससीचे नऊ पेपर्स घेण्यात येणार असून त्यापैकी दोन पेपर्स हे क्वॉलिफाईंग स्वरुपाचे असतील तर इतर सात पेपर्सचे गुण अंतिम यादीसाठी धरण्यात येणार आहेत. या परीक्षेमधून जे परीक्षार्थी उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या :