नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा मलिक चर्चेत आले आहेत. सत्यपाल मलिक यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधत आहे. मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'अहंकारी' म्हटले आहे. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होण्याआधी भाजपमध्ये होते. भाजपनेच त्यांना बिहार, जम्मू काश्मीर आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल बनवले आहे.  पंतप्रधान मोदींचा शेतकरी आंदोलनाबद्दलचा पवित्रा किती अहंकारानं भरलेला होता. त्यांनी शहीद शेतकऱ्यांबद्दल काय विधान केलं होतं, याबद्दल मलिक यांनी सणसणीत वक्तव्य केलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहंकारी आहेत. शेतकरी आंदोलनात 500 शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा मुद्दा त्यांच्याशी झालेल्या भेटीत काढला तर पंतप्रधान म्हणाले की, ते माझ्यासाठी मेलेत का? हा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. हरियाणातील एका कार्यक्रमात सत्यपाल मलिक यांनी हे वक्तव्य केले आहे. सत्यपाल मलिक हे राज्यपाल पदावर असले तरी ते अगदी बिनधास्तपणे सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करत असतात. याआधीही त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत.


सत्यपाल मलिक यांची काही बेधडक वक्तव्य


1) शेतकरी आंदोलनकांच्या सर्व मागण्या योग्य, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे 600 शेतकऱ्यांचा बळी, मी शेतकऱ्यांसोबत उभा आहे
2) लखीमपूर हत्याकांड घडल्याक्षणी केंद्रीय मंत्री अजय मिश्राचा राजीनामा व्हायला पाहिजे होता. तसंही हा माणूस मंत्रिपदासाठी लायकच नव्हता
3) कश्मीरचा राज्यपाल असताना मला 300 कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती. एका प्रसिद्ध उद्योगपतीनं आणि संघाशी संबंधित व्यक्तीनं मला दोन फाईली मंजूर करण्याच्या बदल्यात ही ऑफर दिली होती.
4) गोवा सरकारमध्ये भ्रष्टाचार, रेशन पोहोचवण्याच्या योजनेत प्रचंड गैरव्यवहार, मी या सरकारवर आरोप केले म्हणून मला तिथल्या राज्यपालपदावरुन हटवलं गेलं
5) लोक आता सत्य बोलायला घाबरतात. मला ईडी आणि इनकम टॅक्सच्या धाडींचं भय वाटत नाही. 


अशी विधाने सत्यपाल मलिक यांनी केली आहेत.


सत्यपाल मलिक यांच्या या ताज्या बेधडक विधानाची दोन वैशिष्ट्यं आहेत. एकतर ते आजवर सरकारच्या ध्येयधोरणांवर बोलत होते. पण पंतप्रधानांबद्दल इतकं वैयक्तिक ते पहिल्यांदाच बोलले आहेत. काश्मीरमधल्या भ्रष्टाचारात त्यांनी पीएमओलाही आरोपी केलं होतं. पण त्याचवेळी सगळा प्रकार सांगितल्यानंतर पंतप्रधानांनी आपलं कौतुक करत पाठिंबाही दिला होता असंही ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा नवा बदल लक्षणीय आहे. 
मलिक यांचं दुसरं विधान हे मोदी-शाहांच्या केमिस्ट्रीवरच भाष्य करणारं आहे. सार्वजनिक जीवनात मोदी-शाहांच्या या केमिस्ट्रीचं अनेकांना कुतूहल वाटतं, हे नातं नेमकं कसं आहे याची उत्सुकता आहे. बाहेरुन तरी ही जोडी आजवर एकमेकांसाठी परफेक्टच राहिली आहे. त्यामुळे मलिक यांच्या या विधानाचा अर्थ काय हा प्रश्नच आहे.
 
 सत्यपाल मलिक यांची पार्श्वभूमी 


1) उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये 24 जुलै 1946 ला एका शेतकरी जाट कुटुंबात सत्यपाल मलिक यांचा जन्म
 2) 1974 मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार  
 3) दोनवेळा राज्यसभेवर गेले, एकदा चौधरी चरणसिंह तर दुसऱ्यांदा राजीव गांधींनी त्यांना ही संधी दिली
 4) त्यानंतर जनता दल, तर कधी सपा असं करत वाजपेयींच्या काळात ते भाजपमध्ये आले
 5) अमित शाहंच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते
 6) 30 सप्टेंबर 2017 रोजी त्यांना बिहारचं राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं
 7)  गोवा, ओडिशा, कश्मीर सारख्या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली
 8) सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत.


सरकारी व्यवस्थेचा भाग असूनही मोदी सरकारवर इतक्या कडक शब्दात टीका करणारे सत्यपाल मलिक कायम चर्चेत असतात. राज्यपाल म्हणून त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 2022 च्या सप्टेंबरमध्ये संपेल. पण अनेकदा चर्चा होऊनही त्यांना कधी हटवलं मात्र गेलं नाही. आता ही मोदी सरकारची राजकीय मजबुरी आहे का माहिती नाही. पण सत्यपाल मलिक यांच्या बेधडक विधानांची मालिका मात्र थांबलेली नाही.


महत्त्वाच्या बातम्या: