पुणे : महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याने पाठवलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट त्याच्या कार्यालयीन गाडीवर चालक असलेला सुनील घोलप इतर आरोपींना पाठवत असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. घोलप यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
घोलप याने 2020 मधील टीईटीमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अॅपवर पाठवत असे. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे, घोलप याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉटसअॅप चॅटिंग बाबत पुरावा हस्तगत करायचा आहे. घोलप याने स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत.तर, डोंगरे हा सुपे व शिक्षण विभागात खासगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक अजय सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता, अशी माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली.
डोंगरे याला तीन लाख 25 हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने त्यांना तीन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :