नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनीच अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. मागील 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.


आर्थिक मंदीमुळे देशातील अनेक उद्योग सध्या कठीण प्रसंगाला समोर जात आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील लाखो कामगारांना नोकरी गमवावी लागणार असं चित्र सध्या आहे. अर्थव्यवस्थेच्या या बिकट स्थितीवर आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी भाष्य केले आहे. गेल्या 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "मागच्या 70 वर्षात देशात इतका चलन तुटवडा पहिल्यांदाच झाला असून सरकारनं परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेत महत्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

सध्या देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अतिशय महत्वाचं मानलं जात आहे.

राजीव कुमार यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. 'सरकारच्या आर्थिक सल्लागारांनीच आता अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट असल्याचे मान्य केले आहे', असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.