नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेसप्रणित 'नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंह आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. अभाविप प्रमुख शक्ती सिंह यांच्या पुढाकाराने हे पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र याला एनएसयूआयने आक्षेप घेतला होता. यावरुन विद्यापीठात तणावाचं वातावरण होतं.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवला जाऊ शकत नाही, असा आक्षेप 'एनएसयूआय'ने घेतला. त्यानंतर गुरुवारी (22 ऑगस्ट) 'नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करत, 'भगतसिंह अमर रहें' आणि 'बोस अमर रहें' अशी घोषणाबाजीही केली. शिवाय त्यांच्या कृत्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना वाचवण्यात आलं : तुषार गांधी

सोलापुरात पडसाद
या घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले आहेत. सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांकडून सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर निषेध करुन एनएसयूआयच्या पोस्टरवर काळी शाई फेकण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, स्वातंत्रवीर सावरकरांचा विजय असो, एनएसयूआय मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.