Twitter Layoffs in India : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्विटर कंपनीने सध्या भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर कंपनीला मंदीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या कपातीपूर्वी, कंपनीचे 200 पेक्षा जास्त कर्मचारी भारतात काम करत होते. दरम्यानच्या काळात कंपनीच्या व्यवस्थापनातील अनेकांनी राजीनामे दिल्याचेही समजते.



मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागही बरखास्त
सुत्रांच्या माहितीनुसार, अभियांत्रिकी, विक्री, विपणन या विभागातून कर्मचारी काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, भारतातील कामावरून काढलेल्या कामगारांना किती मोबदला देण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही. कंपनीचे भारतातील संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभाग बरखास्त करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.


मस्क यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले
दरम्यान, कंपनीच्या कमाईत झालेल्या नुकसानासाठी मस्क यांनी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी ट्विट केले की एक्टिविस्ट गटाने जाहिरातदारांवर प्रचंड दबाव टाकला होता, ज्यामुळे ट्विटरच्या कमाईचे मोठे नुकसान झाले. यामुळे अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


पराग अग्रवाल यांच्यासह अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मस्कने मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे अधिग्रहण पूर्ण केल्यानंतर गेल्या आठवड्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि इतर अनेक उच्च अधिकाऱ्यांना पायउतार केले होते. यानंतर उच्च व्यवस्थापन स्तरावरही अनेकांना हाकलून देण्यात आले. मस्कने आता कंपनीचे जागतिक कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहे.


भारतात कर्मचारी कपात
ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तवाहिनीला सांगितले की, कंपनीत कर्मचारी कपात सुरू झाली आहे. माझ्या काही सहकार्‍यांना ईमेलद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. दुसर्‍या स्रोताने सांगितले की, यामुळे भारतातील ट्विटर टीमवर परिणाम झाला आहे. दरम्यान, ट्विटर इंडियाने या संदर्भात ईमेलद्वारे केलेल्या प्रश्नांना कंपनीने अद्याप उत्तर दिलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील ट्विटरचे मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभाग पूर्णपणे बरखास्त करण्यात आला आहे.


75 टक्क्यांपर्यंत कर्मचारी कमी करण्याची तयारी
मस्कने ट्विटरचा ताबा घेण्यापूर्वी सोशल मीडिया कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याची चर्चा होती. रिपोर्टमध्ये, असेही म्हटले गेले आहे की, ते 75 टक्क्यांपर्यंत कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


EPFO : पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी न्यायालयाकडून सहा महिन्यांची मुदतवाढ, 15,000 पगाराची मर्यादा रद्द