Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Election 2022) बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी  काँग्रेसने (congress) आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या उमेदवारांच्या यादीत पोरबंदरमधून अर्जुन मोधवाडिया आणि घाटलोडियामधून आणि याज्ञिक यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, यावर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडं देशभराचं लक्ष लागलं आहे.


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपसमोर या विधानसभा निवडणुकीत आपलं स्थान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडं विरोधी पक्ष काँग्रेसनेही पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.






काँग्रेसने 70-80 उमेदवारांची नावे निश्चित केली


काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी (४4नोव्हेंबर) बैठक झाली. यामध्ये काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन केले. यानंतर काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 43 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची काल झालेली दुसरी बैठक होती. ज्यामध्ये 70 ते 80 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी काँग्रेस पहिल्या बैठकीत सुमारे 110 उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.


भाजपने अद्याप उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही


गुजरातमधील सत्ताधारी भाजपने निवडणुकीबाबत अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची अद्याप घोषणा केली नाही. तर आम आदमी पक्षाने 100 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली आहे. इसुदान गढवी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं आहे. 


गुजरात विधानसभेत 182 जागांसाठी प्रतिष्ठेची लढाई


गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई पार पडणार आहे. बहुमतासाठी 92 जागा जिंकायच्या आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग सहाव्यांदा 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसनं 77 जागा जिंकल्या होत्या. 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार असून मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.


सी-व्होटरचा सर्वे


दरम्यान, निवडणुकीच्या आधी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वे केला आहे. या सर्वेनुसार भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 45.4 टक्के मतं मिळतील आणि तब्बल 135 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेनुसार भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज आहे. आपची चर्चा असली तरी या सर्वेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस राहणार असल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 35 जागा मिळतील तर आपला 11 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे.