Prevention of Money Laundering Act : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित उत्खनन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पण सोरेन ईडीपुढे हजर राहिले नाहीत. त्यामुळे सोरेन यांच्यापुढे पर्याय कमी होऊ शकतात. राष्ट्रीय तपास यंत्रणाला सोरेन यांच्याकडून तपासात सहकार्य केले जात नाही. ईडीला सहकार्य न केल्यामुळे भविष्यात अटकेसाठी हे कारण असू शकते, असे सांगण्यात येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांची ही स्थिती महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमख यांच्या प्रकरणाशी मिळतीजुळती आहे.


प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्टनुसार (Prevention of Money Laundering Act) हेमंत सोरेन यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. कागदपत्र सादर करण्यासंदर्भात ईडीकडे सिव्हिल कोर्टाइतकेच अधिकार असतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट्सनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडे ठोस पुरावे आहेत, ते आरोपीसोबत सीएम हेमंत सोरेन यांचा सहभाग दर्शवतात. आरोपी हेमंत सोरेन यांच्यासोबत फक्त राजकीयरित्या जोडलेले आहेत. त्याशिवाय अनाधिकृतरित्या उत्खनन प्रकरणात आणि इतर व्यवसायांसाठी काम केल्याचं समोर आले आहे. 


प्रकरण काय आहे? 
रांचीमधील विशेष PMLA कोर्टात सीएम हेमंत सोरेन यांच्या विश्वासूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  रिपोर्ट्सनुसार, तक्रारीमध्ये तपास यंत्रणांनी भ्रष्टाचार आणि खाणीला भाडेतत्वावर देताना पदाचा गैरवापर केल्याचा हवाला देत मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप केले आहेत. याआधी ईडीने सोरेन यांचे जवळचे आणि विश्वासू पंकज मिश्रा यांना आणि अन्य दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडील 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले होत. तपास यंत्रणाने असा दावा केला होता की, ही गुन्ह्यातील छोटी रक्कम आहे. कारण खननचं काम एक हजार कोटी रुपयांचं होतं.  


सीएम सरोन यांना समन्स बजावण्यापूर्वी तपास यंत्रणा ईडीने मनी ट्रेल केसची माहिती मिळाली होती. तसेच  आरोपी आणि साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत, असे रिपोर्टमध्ये सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलेय. 
ईडीने खनन घोटाळ्यात आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये त्यांनी खाण कशी मिळाली, त्याचे लाभार्थी कोण होते. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सहीचे चेक कुठे मिळाले, यासारखे प्रश्न ईडीने आरोपीला विचारले आहेत.  


अनिल देशमुख आणि सोरेन यांच्या प्रकरणात साम्य काय?  
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ईडीने वारंवार समन्स पाठवले होते. पण देशमुख ईडीच्या कार्यालयात पोहचले नाहीत. जवळपास सहा महिने अनिल परब अंडरग्राउंड होते. दोन नोव्हेंबर 2021 मध्ये अनिल देशमुख यांना ईडीनं ताब्यात घेतलं होतं. अटक केल्यानंतर अनिल देशमुख यांनी अनेकदा कोर्टात धाव घेतली, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. मागील वर्षभरापासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत. सोरेन यांना खनन घोटाळ्याप्रकरणी ईडीनं समन्स बजावलं आहे. पण सोरेन यांनी अद्याप ईडीच्या नोटीसला कोणतेही उत्तर दिलेलं नाही अथवा चौकशीसाठी ते हजर राहिले नाहीत. भविष्यात हेच कारण सांगत ईडी सोरेन यांच्याविरोधात कारवाई करु शकते.