भागलपुर : बिहारच्या भागलपुरमध्ये सोमवारी रात्री भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या दुर्दैवी घटनेत लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जमखी आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधून चालकासह एकूण 9 जण लग्नासाठी जात होते. यावेळी, रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 80 वर आमापूर गावाजवळ एक हायवा ट्रक स्कॉर्पिओवर धडकल्याने अपघाताची घटना घडली. या घटनेनं आनंदावर विरझण पडावं तसं झालं, लग्नकार्यासाठी (Marriage)  निघालेल्या कुटुंबावर शोककळा पसरली. या दुर्घटनेत स्कॉर्पिओतील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. 


हायवा ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक स्कॉर्पिओवर येऊन आदळल्याने हा अपघात झाला. मुंगेरच्या हवेली येथून श्रीमदपूर येथे लग्नाचं वऱ्हाड जात होतं. सुनिल दास यांचे सुपुत्र मोहित यांचा लग्नसोहळा होता, त्यासाठी वऱ्हाड श्रीमदपूर येथे जात होते. तर, स्कॉर्पिओतून वऱ्हाडी कहलगावकडे जात होती, त्यावेळी समोरून आलेल्या हायवा ट्रकने स्कॉर्पिओला धडक दिली. येथील परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने, एकाबाजुला रोड उंच तर दुसऱ्या बाजुला खाली खचल्याचं दिसून येत आहे. त्याच, मार्गावरुन वेगाने जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकचालकाचे वाहनावरील नियत्रण सुटले अन् ट्रक स्कॉर्पिओवर जाऊन धडकली. या अपघातात स्कॉर्पिओमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 


अपघाताची माहिती कळताच स्थानिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना मायागंज मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भागलपुर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. मृत्यूमुखी पडलेल्या 6 जणांमध्ये एका 10 वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. घोगा पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमधील रेती हटविण्यात आली. त्यानंतर, अपघातातील जखमींना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी, 6 जणांचा मृत्यू झाला होता. कहलगावापासून जवळच 7 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांना अपघातातील एका व्यक्तीचा चेहरा ओळखल्यानंतर तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरापर्यत मदतकार्य सुरु होते. 


हेही वाचा


गळ्यात कवड्याची माळ, सोयाबिन शेतकऱ्यांना साद, स्थानिक मुद्द्यांवर भाष्य; धाराशिवमध्ये मोदींचा कुणावर निशाणा


Mumbai Crime News: घरदार नसलेल्या तरुणाच्या नादी लागली अन् जीव गमावून बसली, मानखुर्दमधील तरुणीच्या हत्येमुळे संतप्त वातावरण