आगरताळा : ऑलिम्पिकपटू दीपा कर्माकरने नुकतंच गिफ्ट मिळालेली बीएमडब्ल्यू कार, खराब रस्ते आणि सर्व्हिस सेंटर अभावी परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीपाच्या या निर्णयानंतर त्रिपुरा सरकार खडबडून जागं झालं आहे.


त्रिपुरा सराकरने दीपाच्या बीएमडब्लूसाठी थेट तिच्या घरापर्यंत गुळगुळीत रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात रस्त्याचं कामही चालू होणार आहे.

दीपाच्या घराजवळचे रस्ते खराब झाले आहेत. मात्र लवकरच त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

बीएमडब्लू परत करण्याचा निर्णय

काही दिवसांपूर्वीच दीपाने गिफ्ट मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्या जोडीने दीपाला बीएमडब्ल्यू कार प्रदान करण्यात आली होती. मात्र कारच्या मेन्टेन्सच्या त्रासामुळे दीपाने ती परत कऱण्याचा निर्णय घेतला होता. त्या बीएमडब्ल्यू कारचे मूळ मालक हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही चामुंडेश्वरनाथ यांना ही गाडी परत केली जाईल, असं सांगण्यात आलं होतं.

दीपा तिच्या कुटुंबीयांसह त्रिपुरा राज्यातील आगरतळामध्ये राहते. मात्र या शहरातील रस्ते निमुळते असल्याने आणि रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च परवडेनासा होणार आहे.

द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दीपाचे कोच बिश्वर नंदी यांनी आपण आणि दीपाच्या कुटुंबीयांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. आगरतळामध्ये बीएमडब्ल्यू सर्व्हिस सेंटरही नाही आणि इतकी पॉश कार चालवण्यासारखी रस्त्यांची स्थितीही नाही, असं नंदी म्हणाले होते.

हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनला ही माहिती कळवल्यानंतर त्यांनीही गिफ्ट परत घेण्यास संमती दर्शवली. त्याऐवजी बीएमडब्ल्यूच्या किमतीइतकी रक्कम दीपाच्या खात्यात जमा करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र ते शक्य नसल्यास जितकी रक्कम मिळेल, त्याबाबत आपण समाधानी असू, असंही दीपातर्फे सांगण्यात आल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने म्हटलं होतं.

संबंधित बातमी

सचिनच्या हस्ते प्रदान केलेली BMW दीपा कर्माकर परत करणार