Corruption: भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताचा 85 वा क्रमांक; ट्रान्परन्सी इंटरनॅशनलचा अहवाल
Transparency International: या यादीत भूतान सोडला तर सर्व शेजारी देशांचा क्रमांक हा भारताच्या खाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भारताने एका क्रमांकाने सुधारणा केली आहे.
मुंबई : भ्रष्टाचारी देशांचा विचार करता जगभरातील 180 देशांच्या यादीत भारताचा 85 वा क्रमांक लागतोय असं ट्रान्परन्सी इंटरनॅशनलच्या (Transparency International) करप्शन परसेप्शन इंडेक्स या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या वर्षी भारताने एका क्रमांकाने सुधारणा केली आहे. भारताच्या लोकशाहीच्या सद्य स्थितीवर या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
ट्रान्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेकडून दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या वर्षी एकूण 180 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी त्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराची स्थिती काय आहे, त्यासंबंधी त्या देशातले उद्योगपती आणि तज्ज्ञ काय म्हणतात याचा विचार करण्यात आला आहे. त्या आधारे शून्य ते 100 असे गुण देण्यात येतात. शून्य म्हणजे सर्वात भ्रष्ट देश तर 100 म्हणजे सर्वात स्वच्छ देश अशी संकल्पना आहे.
या पद्धतीनुसार, भारताला 40 गुण मिळाले आहेत तर चीनला 45, इंडोनेशिया 38, पाकिस्तानला 28 तर बांग्लादेशला 26 गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी भारताचा या यादीत 86 वा क्रमांक होता. त्यामध्ये एक अंकाची सुधारणा होऊन तो यावर्षी 85 झाला आहे. तर पाकिस्तानची 16 क्रमांकाने घसरण होऊन तो देश 140 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारतातील लोकशाहीच्या स्थितीवर चिंता व्यक्त
गेल्या काही वर्षांपासून भारताचा क्रमांक स्थिर असला तरी भारतातील भ्रष्टाचार नियंत्रित आणणाऱ्या संस्था दुर्बल होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भारतातील लोकशाहीसाठी ही गोष्ट घातक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :