'या' 10 पैकी कोणताही आजार असणाऱ्या रुग्णांना ट्रेनच्या तिकीट दरांत सूट; रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही तरतूद
Train Fare Discount List: भारतीय रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेल्वे तिकीट दरांत मिळते सवलत.
Train Fare Discount List: भारतीय रेल्वे हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय रेल्वे अनेक सुविधा पुरवते आणि गरजू लोकांना रेल्वेच्या तिकिट दरासह अनेक सवलतही देते. आपल्याला माहीत आहे की, भारतीय रेल्वेकडून सीनिअर सिटीझन आणि दिव्यांगांना रेल्वेच्या तिकीट दरांत सूट मिळते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का? रेल्वे प्रशासनाकडून आजारी लोकांसह इतरही अनेक वर्गांतील लोकांना सूट दिली जाते. रेल्वेकडून काही आजारांनी त्रस्त लोकांसाठी भाड्यात सवलत देण्याची तरतूद आहे. जाणून घेऊया नेमकी कोणाला आणि किती सलवत मिळते त्यासंदर्भात सविस्तर...
जाणून घेऊयात कोणत्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत मिळते. तसेच, त्यांना नेमकी किती रुपयांची सवलत दिली जाते, त्याबाबत...
कोणाला मिळते सवलत?
- कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या अटेंडंटसाठी रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. ते कुठेही उपचारासाठी जात असतील तर त्यांना AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते. तसेच, AC-3 आणि स्लीपरमध्ये 100 टक्के सूट उपलब्ध आहे. तसेच, फर्स्ट क्लास, सेकंड एसी क्लासमध्ये 50 टक्के सूट उपलब्ध आहे.
- थॅलेसेमिया, हृदयरोगी, किडनी रुग्णांनाही रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत देण्यात येते. हृदयरोग असणारे रुग्ण, हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणारे, मूत्रपिंडाचे रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा डायलिसिससाठी गेल्यास रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. या स्थितीत AC-3, AC चेअर कार, स्लीपर, सेकंड क्लास, फर्स्ट एसीमध्ये 75 टक्के सूट उपलब्ध आहे. यासोबतच रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तीलाही सूट मिळते.
- यासोबतच हिमोफिलियाच्या रुग्णांना उपचारासाठी जातानाही रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत मिळते. या रुग्णांसोबत जाणाऱ्या एका व्यक्तीलाही रेल्वेच्या तिकीट दरांत सूट मिळते. या लोकांना सेकंड क्लास, स्लीपर, फर्स्ट क्लास, AC-3, AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते.
- टीबी रुग्णांना उपचारासाठी जाण्यासाठी रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. या रुग्णांना सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये 75 टक्के सूट मिळते. तसेच, रुग्णासोबत जाणाऱ्या व्यक्तीला देखील रेल्वेच्या तिकीट दरांत सूट दिली जाते.
- संसर्ग नसलेल्या कुष्ठरुग्णांनाही सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत दिली जाते.
- एड्सच्या रुग्णांना उपचारासाठी जाताना सेकंड क्लासच्या तिकीट दरांत 50 टक्के सवलत दिली जाते.
- ऑस्टॉमीच्या रूग्णांना प्रथम आणि सेकंड क्लासमधील मंथली सेशन आणि क्वाटर सेशनच्या तिकिटांमध्येही सवलत मिळते.
- तसेच, अॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-3 टायर आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सूट दिली जाते.