नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्षानंतर आंदोलनाने हिंसक वळण घेतेले. या आंदोलनादरम्यान आयटीओ कार्यालयाजवळ एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.


वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर पलटी झाल्याने आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आंदोलनात सहभागी झालेला व्यक्ती ट्रॅक्टर चालवत होता. ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून त्याचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनी मृतदेह तिरंग्यामध्ये गुंडाळून आयटीओ क्रॉसिंगजवळ ठेवला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यास शेतकऱ्यांनी पोलिसांना विरोध केला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती मिळाली नसून पोलिस तपास करत आहे.


मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश (एन्ट्री) आणि बाहेर येण्याचे दरवाजे बंद केले आहे. दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो स्टेशन, ग्रे लाइन येथील सगळे मेट्रो स्टेशन, जामा मस्जिद मेट्रो, दिलशाद गार्डन, झिलमिल और मानसरोवर पार्क मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. तसेच गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोआ परिसरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


संबंधित बातम्या :



Delhi Internet disruption : दिल्लीतील पाच भागातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद



"दिल्लीतील आंदोलनाची परिस्थिती चिघळण्यासाठी केंद्र सरकारचा अहंकार कारणीभूत" - संजय राऊत