नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृह मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसा करणाऱ्यांपासून स्वतःला वेगळे करतो. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो.


किसान मोर्चाने सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अभूतपूर्व सहभागासाठी आम्ही शेतकऱ्यांचे आभार मानतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी शेतकरी ठरलेल्या मार्गावर न गेल्याने मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. बरेच शेतकरी लाल किल्ला परिसरातही शिरले आणि तिथे आपला झेंडा फडवला. मात्र पोलिसांनी लगेचच आंदोलकांना लाल किल्ला परिसरातून हटवलं.


शहरातील अनेक भागात पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे आणि लाठीचार्ज केला. संतप्त शेतकऱ्यांनी एका बसची तोडफोडही केली. राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काही मार्गांवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड करण्यास परवानगी दिली होती. राजधानीच्या सिंघूआणि टिकारी सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या काही गटांनी मंगळवारी सकाळी पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्सही मोडले आणि दिल्लीत प्रवेश केला.


संबंधित बातम्या