नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोआ परिसरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाल किल्ल्या जवळची परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळलेली नसल्याने मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश (एन्ट्री) आणि बाहेर येण्याचे दरवाजे बंद केले आहे. दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो स्टेशन, ग्रे लाइन येथील सगळे मेट्रो स्टेशन, जामा मस्जिद मेट्रो, दिलशाद गार्डन, झिलमिल आणि मानसरोवर पार्क मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. काही आंदोलक आपापल्या सीमांवर परतत आहेत. पण लाल किल्ल्यावर आंदोलकांचा जमाव अजूनही कायम आहे. यातील काही आंदोलकांनी मुख्य बुरुजावर तिरंग्याच्या शेजारी पुन्हा झेंडे लावण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृह मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसा करणाऱ्यांपासून स्वतःला वेगळे करतो. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो.
शहरातील अनेक भागात पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे आणि लाठीचार्ज केला. संतप्त शेतकऱ्यांनी एका बसची तोडफोडही केली. राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काही मार्गांवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड करण्यास परवानगी दिली होती. राजधानीच्या सिंघू आणि टिकारी सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या काही गटांनी मंगळवारी सकाळी पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्सही मोडले आणि दिल्लीत प्रवेश केला.
संबंधित बातम्या :