मुंबई: जावई म्हणजे अवघड जागेचं दुखणं असं म्हटलं जातं. अनेक सासू-सासऱ्यांना आपल्या जावयामुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचं पहायला मिळतं. जावई हा आपल्या कुंडलीतील दहावा ग्रह असल्याचाही प्रत्यय अनेकांना आला असेल. हे झालं सामान्यांचं. पण या जावई नावाच्या नात्याने राजकारणातील अनेक सासऱ्यांची पळता भूई थोडी केली आहे. त्यामुळे कित्येकांची राजकीय कारकीर्द पणालाही लागल्याचं पहायला मिळतं.


अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना बुधवारी ड्रग्ज तस्कराशी आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी एनसीबीने अटक केली. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांची मात्र गोची झाली आहे. त्याच्या जावयाचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी असलेले संबंध लक्षात घेता नवाब मलिक यांच्या डोक्याला मात्र ताप झाला असेल हे नक्की. पण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांना क्लिन चिट दिलीय. त्यांच्या जावयाला अटक केली असली तरी स्वतः नबाब मलिक यांच्यावर व्यक्तिगत आरोप नसल्याचं त्यांनी म्हटलंय.


Drug Case | समीर खान यांना काल अटक, आज घराची झाडाझडती


जावई व्हावा ऐसा गुंडा....
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात. पण ते अजून एका कारणामुळे चर्चेत असतात. ते म्हणजे त्यांचे जावई आणि कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. गेल्या लोकसभेवेळी औरंगाबाद मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांचा आणि दानवेंचा सुरु असलेला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. हर्षवर्धन जाधव यांनी वेळोवेळी व्हिडीओच्या माध्यमातून सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केलीय.


आपले सासरे आपल्याला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप करत हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे हे आपल्यापेक्षा दहापट वेडे असल्याची टीका त्यांनी केली होती. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.


तसं पाहता दानवेंचा राजकीय अनुभव काही हलका नाही पण त्यांना जावईदेखील तोडीस तोड मिळालाय हे नक्की. जावई हा आपल्या राशीतील दहावा ग्रह असल्याचा खरा अनुभव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आला असेल हे नक्की.


औंधमध्ये दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल


मुख्यमंत्रीपद गेलं
जावयांच्या कर्तृत्वामुळे नुसता डोक्याला ताप झाला तर ठिक, ते सहनही केलं जाऊ शकतं. पण मनोहर जोशींना मात्र आपल्या जावयामुळं थेट मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी यांचे जावई गिरीष व्यास यांच्या पुण्यातील जमीनीची मालकी आणि बांधकामावरुन वाद निर्माण झाला होता. एका मोक्याच्या भूखंडावरील शाळेचं आरक्षण उठवलं आणि त्या आरक्षणाचे हस्तांतर दुसऱ्याच एका जमीनीवर केलं गेलं. नंतर त्या मोक्याच्या भूखंडावर इमारत बांधण्यात आली. हे सर्व मनोहर जोशींचे जावई गिरीष व्यास यांनी केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. पदाचा दुरुपयोग करुन आपल्या जावयाला मदत केल्याचे आरोपही त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी सरांवर झाले होते. जावयाच्या भूखंडाच्या मोहापायी पंतांना थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीत भूकंप
आपले आयुष्य भाजप पक्ष वाढवण्यासाठी घालवलेल्या एकनाथ खडसे यांच्या गळ्यात कित्येक वर्षांनी मंत्रीपदची माळ पडली होती. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेलवलकर यांच्यावर आरोप केले. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला. तसेच डॉक्टर प्रांजल खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन ही अलिशान गाडी जप्त करा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर एकनाथ खडसेंच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यामुळे पुढे जाऊन एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.





'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'


देशातील सर्वात मोठा जावई
राज्यातील जावयांनी आपल्या सासऱ्यांना मनस्ताप दिलाच आहे पण देशपातळीवरही याची संख्या काही कमी नाही. यात सर्वात पहिला क्रमांक लागतो तो काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचा. व्यायामाची आणि कसदार शरीराची आवड असणाऱ्या रॉबर्ट वाड्रा यांच्या भूखंडांच्या खरेदी व्यवहारांची चर्चा राष्ट्रीय मीडियात वेळोवेळी होत असते.


रॉबर्ट वाड्रा यांच्या हरयाणातील एका भूखंड खरेदी आणि विक्रीची चर्चा देशभर अजूनही चवीनं चघळली जाते. रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जमीन आणि संपत्ती खरेदी केली आणि यासाठी रिअल इस्टेट कंपनी डीएलएफकडून पैसा देण्यात आला, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता.


रॉबर्ट वाड्रा यांची 2019 साली ईडीकडून मनी लाँड्रिंग आणि परदेशात अवैध पद्धतीने संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी चौकशी केली गेली. जयपूरमधील बिकानेर जिल्ह्यातील कथिक जमीन घोटाळ्याप्रकरणीही रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात आली होती.


त्यातच 2019 सालच्या ईडीच्या चौकशीनंतर त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सगळ्या कॉंग्रेस नेत्यांना घाम फुटला असेल हे नक्की. हा एक जावई असा आहे की त्याच्या कर्तृत्वामुळे सगळा पक्षच अडचणीत येतोय.


माजी पंतप्रधान वाजपेयींचे जावई
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक मुलगी नमिता यांचे पती म्हणजे रंजन भट्टाचार्य. रंजन भट्टाचार्य हे वाजपेयी पंतप्रधान असताना ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) होते. सोबतच त्यांचा हॉटेलचा व्यवसायही होता. रंजन भट्टाचार्य हे वाजपेयींचे सल्लागार ब्रिजेश मिश्रा आणि सचिव एन के सिंग यांच्यानंतर तिसरे शक्तीशाली आणि महत्वपूर्ण व्यक्ती होते अशी दिल्लीच्या वर्तुळात चर्चा असायची. तसेच त्यांचा पीएमओच्या कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत असल्याची चर्चा असायची.


बिहारमध्ये 'सिंघम' या नावावे प्रसिध्द असलेले आयपीएस शिवदीप लांडे हे राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांचे जावई. बिहारमध्ये काम करत असताना शिवदीप लांडेनी आपल्या धडाकेबाज कारवायांनी अनेक गुंडांना घाम फोडला होता. आपल्या जावयामुळे विजय शिवतारे कधी गोत्यात आले नाहीत. पण शिवतारेंनी आपल्या पदाचा वापर करुन आपल्या जावायाला बिहारमधून थेट मुंबईत आणल्याची चर्चा अधून मधून होते.


रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी पोहचली आयकर विभागाची टीम, सलग दुसर्‍या दिवशी चौकशी