मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना काल (13 जानेवारी) अटक केल्यानंतर, एनसीबीने आज त्यांच्या मुंबईतील घराची झाडाझडती घेतली. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. काल तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर एनसीबीने समीर खान यांना अटक केली आणि आज घराची झाडाझडती घेतली. समीर खान यांना आज कोर्टात हजर करुन त्यांची एनसीबी त्यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.


सकाळी सहा वाजता एनसीबीच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम समीर खान यांच्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात दाखल झाली. या इमारतीच्या तळमजल्यावर समीर खान यांचं कार्यालय आहे. एनसीबीच्या टीमने सगळ्यात आधी कार्यालयात जाऊन काही कागदपत्रे तपासली. इलेक्ट्रॉनिक पुरावे जमा केले. त्यानंतर ही टीम त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या समीर खान यांच्या घरी गेली. घरातील सदस्यांची चौकशी केली तसंच काही वस्तूही तपासणीसाठी जप्त केल्या.

करण सजनानी हा मोठा तस्कर आहे. त्याच्या ड्रग्जचा व्यापर केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. करण सजनानीला आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली समीर खान यांना अटक केली आहे. एक दोन वेळा नाही तर अनेक वेळात समीर खान यांच्याकडून आर्थिक मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते आर्थिक मदत का करत होते, करण सजनानी हा पैसा कुठे वापरत होता? ड्रग्ज घेण्यासाठी या पैशांचा वापर केला जात होता का? हे ड्रग्ज कोणाला पुरवलं जात होतं? याचा तपास एनसीबीला करायचा आहे. महाराष्ट्राबाहेरही एनसीबीची कारवाई सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एनसीबीने कारवाई केली. करण सजनानी रामपूरमधून गांजा आणत होता, त्याचंही कनेक्शन समीर खान यांच्याशी आहे का याचा तपास एनसीबी करत आहे.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
दरम्यान जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कायदा आपलं काम करेल आणि योग्य न्याय होईल. मी कायद्याचा आदर करतो आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे."


काय आहे प्रकरण?
एनसीबीने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानीला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही एनसीबीने जप्त केला. करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचं नाव समोर आलं आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून 20 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. यासंदर्भात एनसीबीने समीर खान याची बुधवारी (13 जानेवारी) जवळपास दहा तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली.