नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर दिसून येत आहे. देशात कालच्या दरांच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे.


देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 84.70 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 74.88 रुपये झाली आहे. तसेच मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 91.32 रुपयांवर गेली आहे. तर डिझेलची किंमत 81.60 रुपये प्रतिलिटर झाली आहे.


देशात सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचं हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास आलं आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रति बॅरल 53.88 डॉलरवर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 57.37 डॉलरवर पोहोचला आहे.


सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली होती. ज्यामुळे काल डिझेलचे आणि पेट्रोलच्या दरांत 20 पैशांपेक्षा जास्तने वाढ झाली होती. आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने देशात इंधनदरवाढ झाली आहे. देशातील काही मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे आकडे पाहिले तर ते प्रतिलीटरमागे खालीलप्रमाणं असल्याचं आढळून येतात.


दिल्ली - डिझेल 74.88 रुपये, पेट्रोल 84.70 रुपये


कोलकाता - डिझेल 78. 47  रुपये, पेट्रोल 86.15 रुपये


मुंबई - डिझेल 81.60 रुपये, पेट्रोल 91.32 रुपये


चेन्नई- डिझेल 80.19 रुपये, पेट्रोल 87.40 रुपये


मे 2020 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या


यापूर्वी 4 ऑक्टोबर 2018 रोजी दिल्लीत पेट्रोल 84 रुपये प्रति लीटरच्या उच्चांकावर पोहोचले होते. तर डिझेलने देखील लिटरमागे 75.45 रुपये अशी विक्रमी पातळी गाठली होती. मुंबईत  4 ऑक्टोबर 2018 रोजी पेट्रोलच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली होती. पेट्रोल 91.44 रुपये प्रती लिटर गेलं होतं. मे 2020 पासून पेट्रोल प्रतिलिटर 15 रुपये आणि डिझेलमध्ये 12.50 रुपये प्रतिलिटर महाग झाले आहे.


जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर    


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळवता येऊ शकते. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. याची माहिती तुम्हाला आयओसीएलच्या संकेतस्थळावर उपबल्ध होईल.