मुंबई : भारतीय क्रिकेट कन्ट्रोल बोर्ड ( BCCI) ने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणाऱ्या नीरज चोप्राला एक कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू आणि रवी दहिया यांना प्रत्येकी 50 लाख रुपये तर ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या पीव्ही सिंधु, लवलीना बोरोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ब्रॉन्झ पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघासाठी 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "आपल्या देशाच्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन करत देशाचा गौरव केला आहे. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान करताना आणि विजेत्यांना रोख रक्कम देताना बीसीसीआयला आनंद होत आहे."
नीरज चोप्राचा सुवर्णवेध
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
याआधी आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.
संबंधित बातम्या :
- Neeraj Chopra Wins Gold: नीरज चोप्राचा 'सुवर्णवेध', टोकियो ऑलिम्पिक भालाफेकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत देशासाठी पहिलं 'गोल्ड' मिळवलं
- Neeraj Chopra Exclusive : मिल्खासिंग आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं : नीरज चोप्रा
- Tokyo Olypmic 2020 : कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने जिंकल कांस्य पदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात