भय्यूजी महाराजांच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक
भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती

मुंबई : अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. भय्यूजी महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन सेवेकऱ्यांसोबत एका 25 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आलीय.
पोलिसांनी भय्यूजी महाराजांचे सेवेकरी विनायक दुधाले, शरद देशमुख आणि एका तरुणीला अटक केली आहे. या सर्वांवर लग्नासाठी भय्यूजी महाराज यांना ब्लॅकमेल केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच आरोप ठेवण्यात आला आहे. हे सर्वजण भय्यूजी महाराजांचं आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचंही समोर आलं आहे.
भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला अचानक नवीन वळण लागलं.
भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर 'माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा', असा उल्लेख आहे. भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता.
भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावाही आयुषी आणि कुहू यांनी केला होता. ब्लॅकमेलिंगमुळे विवंचनेत असलेल्या भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा संशय दोघींनी व्यक्त केला होता.
पोलिसांच्या ताब्यात असलेला पूर्वीचा ड्रायव्हर कैलास पाटीलला या कटकारस्थानाची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला होता. यानुसार कलम 164 अंतर्गत कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली होती.
कैलासचा जबाब काय?
'भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. फूटी कोठी भागात राहणारी तरुणी याची सूत्रधार आहे. ही तरुणी भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी येत असे. तिने महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले आणि अश्लील व्हिडिओ तयार केला. डॉ. आयुषी शर्मांसोबत लग्नानंतर तिचं घरी येणं-जाणं बंद झालं. मात्र तिने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यू महाराजांकडून दरमहा दीड लाख रुपये उकळण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवक विनायक दुधाळे आणि शेखरही सहभागी झाले. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरुणीशी संपर्क केला जात असे.' असा जबाब कैलासने दिल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
कोण आहे विनायक?
-विनायक दुधाळे हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे -विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे -भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे -विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















