Omicron Variant Cases in India : कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या शंभरीपलीकडे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, '11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली  आहे. पण ओमायक्रॉनचं स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.  11 राज्यात ओमायक्रॉनचे 101 रुग्ण झाले आहेत.' 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चा हवाला देत म्हटले की, ' दक्षिण आफ्रिकेत डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक वेगानं पसरत आहे. ज्या ठिकाणी समुह संसर्गाची (कम्युनिटी ट्रांसमिशन) शक्यता असते, त्या ठिकाणी ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा अधिक वेगानं होऊ शकतो.  जगभरात ओमायक्रॉन अतिशय वेगानं पसरत आहे. याचा भारतातही संसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे गरज नसल्यास प्रवास करणं टाळायला हवं. जिथं समूह संसर्गाची भीती आहे, अशा ठिकाणी जाणं टाळावं. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.  नव्या वर्षाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची गरज आहे. ' ओमायक्रॉन विरोधात लस प्रभावी ठरत नाही, असे अद्याप कोणत्याही संशोधनातून समोर आलेलं नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, असेही अग्रवाल म्हणाले. 







ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 32 ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये 22 रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा आहे. तर राज्यस्थानमध्ये 17 जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. दक्षिण आफ्रिका देशात उदयास आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. हा विषाणू याआधीच्या सर्व विषाणूंपेक्षा अधिक जलदगतीने पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. पण या विषाणूची लक्षणं आधीच्या तुलनेत काहीशी सौम्य असली तरी याचा प्रसाराचा गती धोकादायक आहे. 


देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या - 
महाराष्ट्र - 32 
दिल्ली-22
राजस्थान- 17
कर्नाटक- 8 
तेलंगणा- 8
केरळ- 5 
गुजरात- 5
पश्चिम बंगाल-1
आंध्र प्रदेश 1
चंडीगढ-1
तामिळनाडू-1


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



संबधित बातम्या : 
Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर टॅबलेटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी
Omicron : ओमायक्रॉन हा सर्वाधिक वेगाने फैलावणारा व्हेरियंट, WHO ने दिला इशारा